आजारी पडणे 'महाग'; सरकारी रुग्णालयांत निवडक उपचार, खासगीत खिशाचीच ‘सर्जरी’
By संतोष हिरेमठ | Updated: April 7, 2025 15:10 IST2025-04-07T15:09:25+5:302025-04-07T15:10:02+5:30
जन आरोग्य योजनेत बसत नसलेल्या आजारांचे उपचार घेताना अनेकांची आर्थिक घडी विस्कटत आहे.

आजारी पडणे 'महाग'; सरकारी रुग्णालयांत निवडक उपचार, खासगीत खिशाचीच ‘सर्जरी’
छत्रपती संभाजीनगर : सरकारी रुग्णालये गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरत आहेत, परंतु सरकारी रुग्णालयांत मर्यादित उपचार होत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागतो, हे आजचे वास्तव आहे. मात्र, खासगी रुग्णालयांतील उपचार सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. जन आरोग्य योजनेत बसत नसलेल्या आजारांचे उपचार घेताना अनेकांची आर्थिक घडी विस्कटत आहे.
दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. यावर्षी ‘निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य’ ही या दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना माता आणि नवजात बालकांचे आरोग्य आणि जगणे वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते आणि याचे उद्दिष्ट टाळता येण्याजोग्या माता आणि बालमृत्यूंबद्दल जागरूकता वाढवणे आहे. नुकत्याच पुण्यात घडलेल्या गरोदर मातेच्या मृत्यूच्या घटनेने प्रसूतीसाठी येणाऱ्या खर्चाविषयाची चिंता व्यक्त होत आहे.
इतर पॅथींकडे वाढतोय कल
ॲलोपॅथीतील महागड्या उपचारांमुळे आता अनेक रुग्ण आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आदी पर्यायी थेरपी निवडत आहेत.
खर्च वाढला
आरोग्यसेवेचा वाढता खर्च अनेकांसाठी परवडणारा राहिलेला नाही. आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करणे, विमा कवचाचा विस्तार, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर आदींद्वारे आपण एक निरोगी आणि न्याय्य समाज घडवू शकतो.
- डॉ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन
रुग्णसेवा एक जबाबदारी
योजना आणि इन्शुरन्स कंपन्यांच्या अटी, पेमेंटमधील विलंब आणि कागदपत्रांची पूर्तता यामुळे वैद्यकीय सेवा देताना अधिक वेळ, मनुष्यबळ व संसाधन लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेता, फीमध्ये थोडी वाढ करणे ही एक अपरिहार्य गोष्ट झाली आहे. रुग्णसेवा फक्त व्यवसाय नाही, ती एक जबाबदारी आहे.
- डॉ. अनुपम टाकळकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन