चौकशी समितीने आवळला फास
By Admin | Published: March 14, 2016 12:39 AM2016-03-14T00:39:57+5:302016-03-14T00:56:56+5:30
औरंगाबाद : प्राणिसंग्रहालयातील बिबट्यांच्या पिलांच्या मृत्यूप्रकरणी वन विभागापाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागाकडूनही चौकशी होत आहे.
औरंगाबाद : प्राणिसंग्रहालयातील बिबट्यांच्या पिलांच्या मृत्यूप्रकरणी वन विभागापाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागाकडूनही चौकशी होत आहे. मनपा आयुक्तांच्या विनंतीवरून पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातर्फे ही चौकशी केली जात आहे. रविवारी या विभागाच्या एका पथकाने प्राणिसंग्रहालयात येऊन दीड तास चौकशी केली.
मनपाच्या प्राणिसंग्रहालयात १७ फेबु्रवारी रोजी हेमलकसा येथून बिबट्यांची एक जोडी आणण्यात आली. त्यातील रेणू नावाच्या बिबट्याने येथे आल्यानंतर ७ मार्च रोजी तीन गोंडस पिलांना जन्म दिला. मात्र जन्मानंतर अवघ्या ३६ तासांतच या पिलांचा मृत्यू झाला. रेणू गरोदर असल्याची कोणतीही पूर्वकल्पना प्राणिसंग्रहालय प्रशासनाला नव्हती. त्यामुळे तिची योग्य काळजी घेण्यात आली नाही. शिवाय आठवडाभर आधी ती आजारी पडल्यामुळे तिला औषधांचे हाय पॉवर डोस दिले गेले. परिणामी रेणूची मुदतपूर्व प्रसूती झाली. त्यामुळे पिल्ले अशक्त जन्मून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यासह संबंधित अधिकारी अडचणीत आले आहेत. याप्रकरणी वन विभागाने शनिवारीच गुन्हा दाखल केला आहे. आता वन विभागाकडून याप्रकरणी स्वतंत्र चौकशी केली जात आहे. दरम्यान, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीही याप्रकरणी चौकशी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांना पत्र लिहून चौकशी अहवाल देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे पशुसंवर्धन विभागाने या प्रकरणात नियुक्त केलेल्या चौकशी समितीने आज रविवारी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. चार सदस्यीय पथकाने रेणूला ठेवलेला पिंजरा, तिच्या केलेल्या उपचारांची कागदपत्रे आदींची पाहणी केली. तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडूनही माहिती घेतली. मनपा आयुक्तांनी या पथकाला अहवाल सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर डॉ. नाईकवाडे यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.