आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:03 AM2021-05-29T04:03:56+5:302021-05-29T04:03:56+5:30
सोयगाव : गेल्या खरिपाच्या नुकसानीची चिंताजनक स्थिती डोळ्यांदेखत पाहावली न गेल्याने तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. या आत्महत्याग्रस्त ...
सोयगाव : गेल्या खरिपाच्या नुकसानीची चिंताजनक स्थिती डोळ्यांदेखत पाहावली न गेल्याने तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना यंदाच्या खरिपाचीही चिंता पडली आहे. कारण खरीप हंगाम डोक्यावर आला असतानाहीसुद्धा प्रशासनाकडून या आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सोयगाव तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना यंदा शेती कसण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. रासायनिक खतांच्या जुळवाजुळवपासून ते बियाण्यांच्या तजविजीपर्यंतची आर्थिक घडी कशी बसवायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना कुठलीच मदत मिळालेली नाही. गेल्या वर्षी खरिपाच्या चिंतेने मृत्यूला कवटाळलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाला यंदा खरिपात बँकाही पीक कर्जासाठी उभे करीत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे या कुटुंबीयांची खरिपाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. या कुटुंबीयांनी पैसाच नसल्याने अद्यापही खरिपाच्या पूर्वतयारीची मशागतही केली नाही.
------ पाच वर्षांत ६४ शेतकरी आत्महत्या ------
सोयगाव तालुक्यात पाच वर्षांपासून खरिपाच्या पिकांवर निसर्ग कोपल्याने तब्बल ६४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. शेती पिकांची झालेली चिंताग्रस्त स्थिती आणि त्यातच कर्ज फेडण्याच्या विवंचनेने या ६४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. मात्र, यंदाच्या हंगामातही या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांसाठी प्रशासनाकडून कोणतीही मदत तर दूरच, या कुटुंबीयांना भेटीही दिलेल्या नसल्याची स्थिती आहे.