दवाखान्यात गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले

By Admin | Published: June 25, 2014 01:18 AM2014-06-25T01:18:59+5:302014-06-25T01:28:20+5:30

औरंगाबाद : सिटी केअर हॉस्पिटलमध्ये आईचे आॅपरेशन असल्यामुळे दोघे बहीण-भाऊ घराला कुलूप लावून दवाखान्यात गेले.

The family home was broken into the hospital | दवाखान्यात गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले

दवाखान्यात गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले

googlenewsNext

औरंगाबाद : सिटी केअर हॉस्पिटलमध्ये आईचे आॅपरेशन असल्यामुळे दोघे बहीण-भाऊ घराला कुलूप लावून दवाखान्यात गेले. ही संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून २ लाख ५० हजार रुपयांची रोकड व १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने पळविल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
मुकुंदवाडी पोलिसांना माहिती मिळताच डॉग स्क्वॉड, फिंगर प्रिंट तज्ज्ञांसह घटनास्थळी धाव घेतली. फिंगर प्रिंट तज्ज्ञांनी दरवाजा तसेच लोखंडी कपाटावरील चोरट्यांच्या बोटांचे ठसे घेतले. श्वान नेहमीसारखे यावेळीही काही अंतरापर्यंतच चोरट्यांचा माग काढू शकले. शेवटी पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात ठाणे अंमलदार एम. बी. गोरे यांनी दिलेली माहिती अशी की, सिडको एन-२ परिसरातील ठाकरेनगरमध्ये एस. जी. लालसरे यांचे घर आहे. अभियंते असलेले बहीण-भाऊ वर्षभरापासून किरायाने त्यांच्या एका घरात राहतात. कुंदा प्रधान या एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, तर सिद्धोधन तुकाराम प्रधान (३६) हे खाजगी कंपनीत आहेत. आईच्या डोक्याचे मंगळवारी आॅपरेशन असल्यामुळे सोमवारी रात्री कुंदा व सिद्धोधन हे दोघेही दवाखान्यात आईजवळ होते, तर घरमालक लालसरे हे कुटुंबासह बाहेरगावी गेलेले होते.
घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी पहाटे ५ वाजेदरम्यान प्रधान यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाट उचकटून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले २ लाख ५० हजार रुपये रोख, ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, ३० हजार रुपये किमतीची कर्णफुले, ६० हजार रुपये किमतीचा गोफ व १० हजार रुपये किमतीचे पैंजण, असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सिद्धोधन प्रधान पहाटे ५ ते ६ वाजेदरम्यान जेव्हा घरी गेले. त्यावेळी घर फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही घटना मुकुंदवाडी पोलिसांना कळविली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक गणेश राठोड, सहायक निरीक्षक मधुकर साळवे, उपनिरीक्षक कसबे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
आईच्या आॅपरेशनचे पैसे पळविले
प्रधान यांच्या आईच्या डोक्याची नस फाटली आहे. त्यांचे यापूर्वी एक आॅपरेशन झालेले आहे. अलीकडे १८ जूनपासून पुन्हा त्यांच्या आईला सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, आज मंगळवारी पुन्हा एक आॅपरेशन होते. आतापर्यंत अडीच लाख रुपयांचा दवाखान्याचा खर्च लागला असून, मंगळवारी आयोजित आॅपरेशनसाठी त्यांनी पैशाची जमवाजमव केलेली होती. नेमका त्याच पैशावर व दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला.

Web Title: The family home was broken into the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.