वाळूज महानगरात कौटुंबिक कलह, नैराश्यातून आत्महत्येचे सत्र; तीन आठवड्यांत ९ जणांची संपविले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:02 AM2021-06-23T04:02:26+5:302021-06-23T04:02:26+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगरात आत्महत्या करणाऱ्यांचा आलेख वाढतच असून, गत तीन आठवड्यांत ९ जणांनी जीवन संपविले आहे. कौटुंबिक ...
वाळूज महानगर : वाळूज महानगरात आत्महत्या करणाऱ्यांचा आलेख वाढतच असून, गत तीन आठवड्यांत ९ जणांनी जीवन संपविले आहे. कौटुंबिक कलह व नैराश्यातून आत्महत्या होत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात रोजगाराची संधी असल्यामुळे देशाच्या विविध भागांतून आलेले कामगार वाळूज महानगरात स्थायिक झाले आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या अनेक कामगारांच्या पत्नीही कारखान्यात काम करतात. मात्र, गत दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे उद्योगाची घडी विस्कटल्याने कामगारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे उपासमारीचे वेळ आल्याने अनेक कामगार मूळगावी गेले होते. आता अनलॉक झाल्यानंतर स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी काही छोटे उद्योग व व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेक कामगारांचा रोजगार हिरावला गेला आहे. नवीन काम मिळत नसल्यामुळे कुटुंबाचे पालन-पोषण कसे करावे याची चिंता कामगारांना सतावत आहे. यातूनच नैराश्य येत आहे, तर काही जण कौटुंबिक कलहास समोरे जात आहेत. यातूनच तीन आठवड्यांत ९ जणांनी जीवनयात्रा संपविली आहे. बहुतांश जणांनी कौटुंबिक कलह, पती-पत्नीतील वाद, तसेच नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून पती- पत्नी एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी घेऊन येत असतात. या तक्रारदारांचे समुपदेशन करून तसेच वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवून त्यांच्यात समेट घडविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.
...यांनी केली आत्महत्या
वाळूज महानगर परिसरात देवीदास नाथाजी प्रधान (जोगेश्वरी), विष्णू तुकाराम तौर (बजाजनगर), गिरजानाथ लक्ष्मण भोंड (वाळूज), अनिल दादाराव तांगडे (बजाजनगर), शेख सानिया सत्तार (जोगेश्वरी), अनिल गीताराम कदम (बजाजनगर), रोजा मनोज पाटील (रांजणगाव), पपिता राहुल वानखडे (वाळूज) यांनी गळफास घेत मृत्यूला कवटाळले आहे, तर विलास आसाराम थोरात याने नांदेडा शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.