कुटुंबाची साथ असेल, तर उत्तुंग यश मिळवता येते : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 02:21 PM2019-12-21T14:21:57+5:302019-12-21T14:29:06+5:30

राजकीय जीवनात कार्यरत असताना माझे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांची मोलाची साथ दिली.

With family support, great success can be achieved: Sharad Pawar | कुटुंबाची साथ असेल, तर उत्तुंग यश मिळवता येते : शरद पवार

कुटुंबाची साथ असेल, तर उत्तुंग यश मिळवता येते : शरद पवार

googlenewsNext
ठळक मुद्देअंकुशराव कदम यांचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती 

औरंगाबाद : राजकीय जीवनात कार्यरत असताना माझे मोठे बंधू अप्पासाहेब पवार यांची मोलाची साथ दिली. त्यांनी कृषिक्षेत्रासह विधायक कामांमध्ये मोठा हातभार लावला. त्यामुळे मला यश मिळवता आले, तसेच एमजीएम संस्थेच्या उभारणीत कमलकिशोर यांची दृष्टी आणि अंकुशराव यांचे कष्ट असल्याचे दिसते. अंकुशराव यांनी तल्लीन होऊन काम केले. कशाचीही अपेक्षा ठेवली नाही. यामुळेच एमजीएमचे नंदनवन फुलले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी येथे काढले.

एमजीएम विद्यापीठाचे कुलपती तथा एमजीएमचे सचिव अंकुशराव ऊर्फ बाबूराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील होते. व्यासपीठावर एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, महोत्सव समितीचे अध्यक्ष आ. विक्रम काळे, आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, सत्कारमूर्ती अंकुशराव कदम, त्यांच्या पत्नी अनुराधा कदम आणि रंगनाथ काळे उपस्थित होते.  

शरद पवार म्हणाले, कमलकिशोर यांच्याकडे दृष्टी आणि बाबूरावांचे कष्ट यातून एमजीएमने ही झेप घेतली आहे. कमलकिशोर हे आमदार झाले, मंत्री झाले; पण त्याला काही महत्त्व नाही. त्यांनी कुटुंबाच्या मदतीने औरंगाबाद, नांदेड, परभणी, नवी मुंबई, दिल्ली येथे उभारलेल्या संस्था महत्त्वाच्या आहेत. या विधायक कामाचे समाधान मंत्रीपदापेक्षा अधिक आहे. एमजीएम संस्था सामाजिक भान जपत असल्यामुळे मराठवाड्यातील युवकांना विशेषत: विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्याचेही पवार यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात आ. दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, एमजीएम संस्थेच्या उभारणीमध्ये बाबूराव कदम यांचे मोठे योगदान आहे. त्यांना जेव्हा जेव्हा भेटण्याचा योग आला तेव्हा तेव्हा अतिशय शांत, संयमी असे बाबूराव आढळून आले. ते कोणावरही रागावल्याचे किंवा चिडल्याचे दिसून आले नाही. हीच त्यांची खासियत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कमलकिशोर कदम यांनीही बाबूराव कदम यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. बाबूराव हे लहानपणापासून कलासक्त आहेत. पेटिंगमध्ये तर त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेले आहे. एखादे काम हाती घेतले तर अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात आ. विक्रम काळे यांनी एमजीएमच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच बाबूराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवार यांच्या हस्ते अंकुशराव कदम यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  कदम यांच्या जीवनपटाची चित्रफीत दाखवण्यात आली. तत्पूर्वी अंकुशराव कदम यांच्या गौरवग्रंथाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मानपत्राचे वाचन समन्वयक नीलेश राऊत यांनी केले. सूत्रसंचालन महेश अचिंतलवार यांनी केले, तर आभार रंगनाथ काळे यांनी मानले.  कार्यक्रमाला साहित्य, संस्कृती, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. रुक्मिणी सभागृह खचाखच भरलेले होते.

तुम्ही कलावंत...
अंकुशराव कदम हे हाती घेतलेले काम परिपूर्ण होईपर्यंत राबतात. त्यासाठी कष्ट घेतात. ते उत्तम चित्रकार आहेत.  शंकरबापू आपेगावकर यांच्याकडून पखवाज वादनाचे प्रशिक्षण घेणे, पार्वती दत्ता यांच्याकडून कथ्थक नृत्य शिकणे, पॉट्रीज तयार करणे यातून त्यांचे कलेवरील प्रेम दिसते. अंकुशराव तुम्ही कलावंतच आहात, असे प्रमाणपत्र कमलकिशोर कदम यांनी या कार्यक्रमात देताच टाळ्यांचा कडकडाट होत राहिला.

मराठवाड्यातील तरुण पिढी कर्तबगार
मराठवाडा मागास असल्याचे सतत सांगण्यात येते. हे मला पटत नाही. मागासलेला वगैरे काही नाही. देश-विदेशात भारतीय तरुण मला भेटतात. त्यात मराठवाड्यातील अनेक जण असतात. मराठवाड्यातील तरुण पिढी अतिशय कर्तबगार आहे. प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी नोंदवत आहे. या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

जिद्द असेल तर कोणतेही आव्हान पेलू शकता
कमलकिशोर कदम यांनी मनोगतामध्ये बाबूराव हे कथ्थक शिकल्याचे सांगितले. हाच धागा पकडत शरद पवार म्हणाले, आम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एका पाटील असलेल्या युवकाने कथ्थकमध्ये निपुण असलेल्या युवतीवर टिप्पणी केली. ही टिप्पणी आवडली नसल्यामुळे त्या युवतीने पाटील असलेल्या युवकाला त्या ठिकाणीच खरमरीत उत्तर दिले. हा पाटील ग्रामीण भागातला. त्याला चांगलेच लागले. त्याने तात्काळ कथ्थकची शिकवणी लावली. पाटील असूनही तीन-तीन तास सराव करून कथ्थकमध्ये पारंगत झाला. पुढे ती युवती आणि पाटलाने मिळून राष्ट्रीय पातळीवर कथ्थकमध्ये सुवर्णपदक पटकावले.
पुढे हाच पाटील राजकीय क्षेत्र सोडून प्रशासकीय क्षेत्रात गेला. त्याठिकाणी जिल्हाधिकारी, आयुक्त अशी विविध पदे भूषविली. १९९९ साली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काढली. तेव्हा कराडमधून कोण लढणार, असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा त्या पाटलाला फोन केला. कुठे आहेत? त्यांनी उत्तर दिले नागपूरला. तात्काळ मुंबईत येऊन भेट द्या, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी आले. भेटल्यावर काय? असे विचारले. तेव्हा त्यांना विभागीय आायुक्तपदाचा राजीनामा देऊन या, असे सांगितले. ते दोन तासांत राजीनामा देऊन आले. पुन्हा म्हणाले आता काय? त्यांना खादीचे चार जोड खरेदी करा आणि कराडला निवडणूक लढविण्यास जा, असे सांगितले. ते लोकसभेत निवडून आले. दुसऱ्यांदा आले. त्यानंतर राज्यपाल झाले. आता पुन्हा ते साताऱ्यातून खासदार बनले आहेत. ते पाटील म्हणजेच श्रीनिवास पाटील होय. तयारी असेल तर व्यक्ती कोठेही यशस्वी होऊ शकते, असे शरद पवार यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.


सत्काराला उत्तर
माझ्या अमृतमहोत्सवी सत्कारासाठी संस्थेतील अनेकांचा आग्रह होता. मात्र, त्याला माझा विरोध होता. त्यामुळे हा कार्यक्रम होत नव्हता. तरीही माझ्या कार्यालयाच्या शेजारच्या खोलीत प्रतापराव बोराडे यांच्याकडे मागील काही दिवसांपासून सतत बैठकी होत. एमजीएम विद्यापीठाचे उद्घाटन आणि वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांच्याकडे मी आणि प्रतापराव गेलो. तेव्हा त्यांनी सांगितले की, सकाळीही कार्यक्रम आहे ना? मला काही समजले नाही. तेव्हा प्रतापराव यांनी सगळे सिक्रेट असल्याचे सांगितले. मला लक्षात आले; पण पवार साहेब येणार म्हटल्यावर मी नाही म्हणू शकलो नाही. कारण त्यांचा सहवास मिळणार होता. एमजीएम संस्थेच्या निर्मितीमध्ये शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी मिळाली. ते सुरू करण्यासाठी कमलकिशोर आणि आम्ही धडपड करीत होतो. पैशांची जुळवाजुळव होत नव्हती. तेव्हा थेट शरद पवार यांना फोन केला. त्यांनी विचारले किती पैसे आहेत, तर १०० रुपये असल्याचे सांगितले. लागणार किती? १० लाख रुपये. मग त्यांनी पुण्यात येण्याच्या सूचना केल्या. पुण्यात भेटल्यानंतर महाराष्ट्र बँकेत जाण्यास सांगितले. आम्ही गेलो, तर कर्ज मंजूर झाले. त्यासाठी पवारांनी एक लिफाफा पाठवला होता. काही दिवसांनंतर समजले की, त्या लिफाफ्यात पवारांच्या जमिनीची कागदपत्रे होती. त्याच्या आधारावर आम्हाला कर्ज मिळाले. त्या पैशातून हे रोपटे लागले. त्याचाच हा विस्तार आहे. शुद्ध हेतू असल्यामुळेच हे घडल्याचेही बाबूराव कदम यांनी सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केले.

Web Title: With family support, great success can be achieved: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.