कुटुंब अंगणात तर चोरटे घरात; घरमालक बाहेर झोपल्याची संधी साधत चोरट्यांनी साधला डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 05:10 PM2021-06-01T17:10:28+5:302021-06-01T17:50:50+5:30
१ लाख रुपयांची रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरीस
सोयगाव : तालुक्यातील उप्पलखेडा येथील एका घराचे कुलूप तोडून २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना रविवारी (३०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे घरमालक उकाड्यामुळे समोरच्या अंगणात झोपले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचे आढळून आले. याप्रकरणी बनोटी दुरक्षेत्रात सोमवारी सायंकाळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत असल्याने बहुतेक शेतकरीवर्ग घराच्या अंगणात झोपतात. रविवारी उप्पलखेडा येथील शेतकरी शेख याकुब शेख माजीद हे सुद्धा मुलगी आणि पत्नीसह घरासमोरील अंगणात झोपले होते. तर त्यांची दोन मुळे शेतात झोपण्यास गेली होती. हीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडत रोख रक्कमेसह २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी याकुब यांना कुलूप तुटल्याचे आढळून आले. त्यांनी लागलीच बनोटी दुरक्षेत्रात चोरीचा गुन्हा दाखल केला.
यानंतर पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात १ लाख रुपयांची रोकड आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रतापराव बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण करून चोरांचा माग काढण्यात आला. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक शेजारील जळगाव जिल्ह्य़ात पाठविण्यात आले आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गीते, ठाणे अंमलदार एस.एस.पवार, विकास दुबेले, श्रींकात पाटील, दिलीप तडवी यांचे पथक अधिक तपास करत आहे.