प्रसिद्ध बिल्डर फहीमखान अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:51 AM2018-01-02T00:51:06+5:302018-01-02T00:52:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : भरधाव कंटेनर आणि कारमध्ये झालेल्या धडकेत कारचालक शहरातील बिल्डर फहीमखान रशीदखान (३६, लतीफनगर, देवळाई) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भरधाव कंटेनर आणि कारमध्ये झालेल्या धडकेत कारचालक शहरातील बिल्डर फहीमखान रशीदखान (३६, लतीफनगर, देवळाई) हे जागीच ठार झाले. सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास केंब्रिज ते सावंगी बायपासवर झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकासह दोन जण जखमी झाले. मात्र फहीमखान यांच्या कारमध्ये सापडलेल्या ‘सुसाईड नोट’मुळे हा अपघात आहे की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
कंटेनर चालक योगेश रामपाल चौधरी (३२) आणि आत्मराम राजाराम चव्हाण (४२, दोघे रा. हिंगणे बु. जामनेर, जि. जळगाव) हे जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फहीमखान यांची एम.के. कन्स्ट्रक्शन नावाची बांधकाम कंपनी आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते घरून कारने (एमएच-२० बीजी २०२०) हर्सूल सावंगी येथील त्यांच्या साईटवर जात होते. केंब्रिज शाळा चौकातून ते सावंगी बायपास रस्त्याने असताना समोरून आलेल्या आयशर ट्रकने (एमएच-०६एक्यू ६३०३) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. कारचालक फहीमखान हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले, तर ट्रकचालकही जखमी झाला. या अपघाताच्या आवाजाने परिसरातील लोक मदतीला धावले. प्रत्यक्षदर्शींनी फहीमखान यांना कारमधून बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी फहीमखान यांना तपासून मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच देवळार्ई परिसरातील नागरिकांनी आणि फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनगृहात हलविले. अपघाताची नोंद फुलंब्री ठाण्यात करण्यात आली.
दरम्यान, फहीमखान यांच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी वरीष्ठ पोलीस अधिकाºयांकडे केली आहे.
कारमध्ये सापडली ‘सुसाईड नोट’
फहीमखान यांच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीविषयी पोलिसांनी सांगितले की, गतवर्षी नोटाबंदी झाल्यापासून त्यांची कंपनी तोट्यात आली. अनेक प्रयत्न करूनही कंपनीचा तोटा भरून निघत नव्हता. व्यवसायासाठी त्यांनी अनेकांकडून कर्ज घेतले होते. यापैकी महेश हरिश्चंद्र तरटे याच्याकडून घेतलेले पैसे त्यास परत केल्यानंतरही तो आणखी रकमेच्या मागणीसाठी सारखा तगादा लावत होता. ब-याचदा तो कार्यालयात येऊन त्रास देई. एवढेच नव्हे, तर त्याने घरी येऊन राडा करण्याची धमकी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्याच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले. त्यांच्या मृत्यूला महेश तरटे हा एकमेव जबाबदार असून, त्याला सजा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी चिठ्ठीत व्यक्त केली. यासोबतच त्यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल पत्नीची माफी मागितली. घरातून बाहेर पडताना मुलगी पलक हिच्याकडे पाहण्याची हिम्मत न झाल्याने तिला न उठवताच आपण घराबाहेर पडलो. शिवाय मम्मीला त्रास देऊ नको, अशी भावनिक सादही त्यांनी मुलीला उद्देशून घातली. कार विक्री करून कर्जाची परतफेड करण्याचेही त्यांनी सांगितले.