घाटीतील भावी डॉक्टर आजारांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:44 AM2017-08-28T00:44:03+5:302017-08-28T00:44:03+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वसतिगृहातील अनेक भावी डॉक्टर आजारांच्या विळख्यात सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वसतिगृहातील अनेक भावी डॉक्टर आजारांच्या विळख्यात सापडले आहेत. घसादुखी, उलट्या आणि तापेने फणफणलेल्या विद्यार्थ्यांवर मेडिसीन विभागात उपचार सुरू आहेत.
मेडिसीन विभागातील वॉर्ड क्रमांक ८ व ९ मध्ये काही विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांत‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षापासून तर अंतिम वर्षातील सात ते आठ विद्यार्थ्यांना अचानक ताप, उलट्या आणि घसादुखीचा त्रास उद््भवला. तब्येत खालावल्यामुळे काहींना मेडिसीन विभागात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील काहींना सुटी देण्यात आली आहे. विद्यार्थिनीही आजारी असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. याविषयी घाटी प्रशासनाच्या अधिकाºयांना कल्पनाच नाही. आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांना सहकाºयांनीच उपचारासाठी दाखल केले. तेच त्यांची काळजी घेत होते. दोन दिवसांत कोणीही भेटायला आले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून काही माहिती मिळालेली नाही. वॉटर प्युरिफायर खरेदीसाठी कोटेशन प्राप्त झाले आहेत. आगामी आठ दिवसांत त्यांची खरेदी होऊन ते वसतिगृहात बसविण्यात येतील, अशी माहिती घाटी प्रशासनाच्या अधिकाºयांनी दिली. घाटीत अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रुग्ण, नातेवाईकांबरोबर डॉक्टरांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. दर आठवड्याला एका विद्यार्थी डॉक्टरास उपचारार्थ रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत असल्याची बाब १२ आॅगस्ट रोजी घाटीत पार पडलेल्या बैठकीत समोर आली होती. १५ दिवस उलटून गेल्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’असल्याचे दिसते. त्यामुळे प्रशासनाकडून काहीही हालचाल करण्यात आली नसल्याचे दिसते.