घरापासून दूर घरच्या दिवाळीची अनुभूती; विभाग नियंत्रकांनी घातले ST चालक-वाहकांना अभ्यंगस्नान
By संतोष हिरेमठ | Published: October 24, 2022 09:24 AM2022-10-24T09:24:47+5:302022-10-24T09:30:20+5:30
दिवाळीतील वातावरण खूपच प्रसन्नदायी असले तरी कुटुंबापासून दूर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या जल्लोषापासून मुकावे लागते.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कुटुंबापासून दूर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या जल्लोषापासून मुकावे लागते. अभ्यंगस्नानही कर्मचाऱ्यांच्या नशिबी नसते. मात्र, ही उणीव भरून काढत एसटी प्रशासनातर्फे सोमवारी पहाटे एसटीच्या सिडको बसस्थानकात दिवाळी साजरी करण्यात आली. स्वतः विभाग नियंत्रकांनी चालक-वाहकांना अभ्यंगस्नान घालत कुटूंबियांसोबतच दिवाळी साजरी होत असल्याची अनुभूती दिली.
सहकुटुंब दिवाळी साजरी करण्याचा आनंद काही औरच असतो. उटणे लावून अभ्यंगस्नान केल्यानंतर खमंग फराळावर ताव मारला जातो. मित्र, मैत्रणी, नातेवाईकांच्या भेटी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. दिवाळीतील वातावरण खूपच प्रसन्नदायी असले तरी कुटुंबापासून दूर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या जल्लोषापासून मुकावे लागते. अभ्यंगस्नानही कर्मचाऱ्यांच्या नशिबी नसते. मात्र, ही उणीव भरून काढत औरंगाबादेत एसटी प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांना उटणे, सुगंधी तेल, साबण, अंघोळीला गरम पाणी आणि फराळ दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
सिडको बसस्थानकात विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, आगार व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालक- वाहकांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. कर्मचाऱ्यांना उटणे, सुगंधी तेल, साबण, अंघोळीला गरम पाणी आणि फराळ दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी बद्रीप्रसाद मांटे, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी विजय धनगर उपस्थित होते.