गणपती बाप्पाला आज निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:02 AM2017-09-05T01:02:13+5:302017-09-05T01:02:13+5:30
अकरा दिवस भक्तिभावाने सेवा केल्यानंतर मंगळवारी (दि.५) मोठ्या उत्साहात गणेशभक्त लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देणार आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अकरा दिवस भक्तिभावाने सेवा केल्यानंतर मंगळवारी (दि.५) मोठ्या उत्साहात गणेशभक्त लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देणार आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा जयघोषात गणरायाला निरोप देण्यासाठी शहरात तीन भागातून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यंदा गणाधिपतीचा १२ दिवस मुक्काम होता. सर्वजण धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात एवढे रमून गेले होते की, दिवस कसे निघून गेले हे कोणाला कळलेच नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वजण जड अंत:करणाने श्रीगणेशाला निरोप देणार आहेत. निरोप देण्यासाठी शहरवासीयांनी तयारी केली आहे. शहरात तीन ठिकाणी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर परिसरातून सकाळी ११ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, सर्व आमदार यांच्या हस्ते संस्थान गणपतीची आरती होणार आहे. सर्वप्रथम संस्थान गणपतीच्या प्रतिमूर्तीची मिरवणूक निघेल. त्यानंतर गणेश महासंघ उत्सव समितीच्या मूर्तीची मिरवणूक निघणार आहे. यानंतर शहरातील विविध गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी होतील, अशी माहिती अध्यक्ष राजू शिंदे यांनी दिली.
नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघ
गजानन महाराज मंदिर परिसरातील नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघाच्या श्री विसर्जन मिरवणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. यावेळी खा. चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची उपस्थिती राहील. मुख्य अतिथी म्हणून आ. सुभाष झांबड, प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भगवान घडमोडे, आ. अतुल सावे, आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाट, आ. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहेत. गणेशभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील, अध्यक्ष बाळूसेठ कुंकुलोळ जैन यांनी केले आहे.