वैजपुरात ओल्या दुष्काळाचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:48 PM2019-10-30T12:48:50+5:302019-10-30T12:54:15+5:30
परतीच्या पावसाने केलेला कहर व कर्जबाजारीला कंटाळून तालुक्यातील टूनकी येथे आप्पासाहेब धोंडिराम पवार या शेतकऱ्याची आत्महत्या.
वैजापूर - परतीच्या पावसाने केलेला कहर व कर्जबाजारीला कंटाळून तालुक्यातील टूनकी येथे आप्पासाहेब धोंडिराम पवार (40) या शेतकऱ्याने मंगळवारी (29 ऑक्टोबर) सायंकाळी गावातील नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तालुक्यात परतीच्या पावसाने गेल्या आठवडयापासून चांगलाच कहर केला आहे. या परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या कापूस,मका, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी कापूस, सोयाबीन या पिकांची काढणी करुन दिवाळी साजरी करीत असतो परंतू सततच्या परतीच्या पावसाने शेतीतील कापूस, मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आप्पासाहेब पवार यांच्यावर खासगी व सहकारी, राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज होते.कापूस,मका,कांदे व भाजीपाला याची शेती ते करायचे. परंतु मागील हंगामात दुष्काळ व यंदाचा ओला दुष्काळ यामुळे त्यांचे मोठे वित्तीय नुकसान झाले.
आप्पासाहेब यांच्या भावाचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले असून वडिलांचाही मृत्यू झाला आहे. पत्नी, तीन मुले व भावाची पत्नी व त्याची तीन मुले यांची जबाबदारी आप्पासाहेब यांच्यावर होती. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने कुठल्याही मदत दिली नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याने लवकरात लवकर शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.