... आभाळच फाटले, तर कुठवर करावी शिलाई?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 05:36 AM2019-11-05T05:36:01+5:302019-11-05T05:36:15+5:30
या नुकसानीच्या संकटातून आम्हाला तुम्हीच वाचवा’.
विजय सरवदे
औरंगाबाद : एरव्ही सतत अवर्षणाचा मुकाबला करणारा मराठवाडा यंदा खूप उशिरा झालेल्या अतिवृष्टीने सुन्न झाला आहे. आधीच्या रिमझिम पावसावर डोलणारी पिके परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नष्ट झाली. अक्षरश: अब्जावधी रुपयांची हानी झाली आहे. प्रत्येक गावी जाण्यास, दिलासा देऊन पंचनामे करण्यात प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधीही तोकडे पडत आहेत, असे चित्र आहे.
रविवारी कृषी विभागाचे पथक आदिवासी काळदरीच्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, तेव्हा त्या आदिवासी शेतकºयांना आपणास जागेवरच आर्थिक मदत मिळणार, असे वाटले. पथकातील कर्मचाºयांनी पंचनामा सुरू केला व त्या शेतकºयांकडे कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसाठी आता आमच्याकडे पैसे नाहीत, असे अंकाजी गांगड, लहू गांगड, रामदास मधे, किसान गांगड हे बाधित आदिवासी शेतकरी म्हणाले. ‘आता तुम्हीच आमचे मायबाप. होते नव्हते ते सारे पीक वाया गेले.
या नुकसानीच्या संकटातून आम्हाला तुम्हीच वाचवा’. हतबल शेतकºयांचे हे बोलणे ऐकून कर्मचाºयांचे मन हेलावले.
शेतकरी ढसाढसा रडले
मदत देण्यासाठी सरकारी यंत्रणा येईलच, या आशेवर चातकासारखी वाट बघत गावोगावच्या शेतकºयांचे डोळे रस्त्याकडे लागले आहेत. रविवारी गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला. तेव्हा तेथील शेतकरी बापू घुगे, मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे पालकमंत्री शिंदे व आ. सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले.