शेतकरी नवरा नको गं बाई ! डॉक्टर, इंजिनिअर किंवा नोकरदारच हवा....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:02 AM2021-03-16T04:02:56+5:302021-03-16T04:02:56+5:30
एक काळ असा होता, जेव्हा मुलाचा होकार आला की, मुलीचा होकार आपोआपच गृहीत धरला जायचा आणि धूमधडाक्यात लग्न लावून ...
एक काळ असा होता, जेव्हा मुलाचा होकार आला की, मुलीचा होकार आपोआपच गृहीत धरला जायचा आणि धूमधडाक्यात लग्न लावून दिले जायचे. आता मात्र लग्नासाठी मुलीचा होकार मिळवायला, मुलांना काय काय दिव्यातून जावे लागत आहे, याचा अनुभव वधू-वर सूचक केंद्र चालविणारी मंडळी रोजच घेत आहेत. नोकरदार मुलांनाच सर्वाधिक प्राधान्य असून शेतकरी नवरा ही संकल्पना मुलींच्या दृष्टीने कधीच ‘आऊटडेटेड’झाली आहे.
जागतिकीकरण, शिक्षण किंवा स्वातंत्र्य यांचा हा एकत्रित परिणाम असेल; पण मुलींच्या अवास्तव मागण्यांपायी लग्नाचे वय आणि पालकांची हतबलता वाढते आहे, एवढे मात्र नक्की. सर्वच समाजातील मुलींच्या वाढत्या अपेक्षा हा दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत जाणारा प्रश्न आहे, असे काही वधू-वर सूचक केंद्रांतर्फे सांगण्यात आले.
चौकट :
पुणे- मुंबईचाच नवरा हवा
मुलगी खेड्यातली असो, तालुक्यातली किंवा मुंबई-पुणे वगळता अन्य शहरातली असो. प्रत्येकीला नवरा पाहिजे आहे तो पुण्याचा किंवा मुंबईचा आणि गलेगठ्ठ पगाराचा. डॉक्टर, सीए अशा प्रोफेशनमध्ये असणाऱ्या मुली सारख्या प्रोफेशनमधील नवरा असावा, अशी मागणी करत आहेत. तरीही इंजिनिअर, सीए मुलांना मुलींची सर्वाधिक पसंती मिळत आहे. शेतकरी मुलगा तर मुलींच्या हिशेबातही नाही. मग त्याची १०० एकर शेती असली तरीही मुलींना तो नकोच आहे.
चौकट :
या अटी मान्य असतील, तरच बोला !
- पुणे, मुंबई किंवा मेट्रो सिटी नाही तर थेट परदेशी राहणारा उच्चशिक्षित आणि भरभक्कम पगाराचा नवरा हवा.
- मुलाचे वय आपल्यापेक्षा २- ३ वर्षांनीच जास्त असावे.
- स्वत:चे घर आणि तेही सर्व सोयी-सुविधा असलेलेच हवे. शिवाय कोणतेच हप्ते मागे नकोत.
- चारचाकी गाडी तर पाहिजेच.
- मुलाच्या आई-वडिलांना त्यांची स्वत:ची मिळकत असावी. मुलाच्या पगारावर ते अवलंबून नसावेत.
- मुलावर बहीण किंवा भावाची जबाबदारी नसावी.
चौकट :
शेतकरी वरपिता म्हणतो
मुलगी काळी असो किंवा गोरी असो. शिकलेली असो की अडाणी असो. गरीब घरची असली तरीही चालेल. कशीही मुलगी असली तरी आम्ही लग्न करून घेऊ, तिने फक्त लग्नासाठी होकार द्यावा, अशी हतबलता अनेक शेतकरी वरपिता वधू-वर सूचक मंडळांकडे बोलून दाखवत आहेत.
प्रतिक्रिया-
१. मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या
औरंगाबाद, जालना यासारख्या शहरात राहायलाही मुली तयार नाहीत. त्यामुळे तालुका किंवा खेड्यात राहणारा नवरा करण्याचा प्रश्नच येत नाही. ४०-४५ हजार रुपये मासिक पगार असणाऱ्या मुलांनाही मुली नाकारत आहेत. पूर्वी मुलांच्या अटी असायच्या, आता मात्र मुली अटी ठेवत असून त्यांच्या अपेक्षा खूप वाढत चालल्या आहेत. या नादात त्यांचे स्वत:चे लग्नाचे वय उलटून जात आहे, याचेही त्यांना भान नाही.
- सुनील काला
पुलक मंच
२. आई-वडिलांच्या अपेक्षा वाढल्या
आपल्याला जे मिळाले नाही, ते आपल्या मुलीला द्यावे, हा पालकांचा प्रयत्न असतो. त्या नादात मुलींप्रमाणे त्यांच्या पालकांच्याही खूप अपेक्षा वाढल्या आहेत. गाडी, बंगला, बँक बॅलेन्स हे सगळे करताना मुलांचे वय तिशीच्या पुढे निघून जाते, टक्कल पडायला लागते. अशा मुलांनाही मग ‘सगळे चांगले आहे; पण मुलगा एजेड दिसतोय’, असे म्हणत मुली नाकारतात.
- विजया कुलकर्णी, ब्राह्मण महिला मंचचे वधू-वर परिचय मंडळ