बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा बळी; भावकीतील दोघांनीच संपवले शेतकऱ्याला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:30 IST2025-01-09T17:29:42+5:302025-01-09T17:30:02+5:30
शेतीच्या वादातून भावकीतील दोघांनी केला एकाचा खून; वैजापूर तालुक्यातील घटना

बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा बळी; भावकीतील दोघांनीच संपवले शेतकऱ्याला
वैजापूर : शेतीच्या वादातून काठीने जबर मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना तालुक्यातील चिंचडगाव येथे सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. सुनील कडुबा वाघ (वय ३० वर्षे, रा. चिंचडगाव) असे मृताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिंचडगाव येथील सुनील कडुबा वाघ यांची पत्नी व दोन मुले हे माहेरी राहतात. त्यांचे आई, वडीलही मृत असल्याने ते घरी एकटेच राहत होते. सुनील वाघ व विजय पुंजाहरी वाघ हे भावबंद असून त्यांची शेजारी शेजारी शेती आहे. या दोघांमध्ये सामाईक बांधावरून नेहमी वाद होत असत. या जुन्या वादातून विजय वाघ व पोपट लहानू वाघ या दोन मित्रांनी चिंचडगाव येथील समाज मंदिरासमोर सुनील वाघ यांना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास काठीने जबर मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत सरपंच शरद बोरनारे यांनी सुनील वाघ यांचे मेव्हणे हिंमत भोसले व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत सुनील यांचा मृतदेह वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. तेथे मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी हिंमत नारायण भोसले (रा. भामाठाण) यांच्या फिर्यादीवरून विजय वाघ व पोपट वाघ या दोन जणांविरुद्ध विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत.
आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी
घटना घडल्यानंतर पोलिसांंनी तातडीने कारवाई करून विजय पुंजाहरी वाघ व पोपट लहानू वाघ या दोन्ही आरोपींना गावातूनच अटक केली. त्यानंतर त्यांना मंगळवारी वैजापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.