बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार; भीतीमुळे पैठण तालुक्यातील गोपेवाडी येथे नागरिकांचे रात्रभर जागरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:16 AM2018-09-07T11:16:12+5:302018-09-07T13:44:43+5:30

गोपेवाडी शिवारात बिबट्याने हल्ला केल्याने पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला

Farmer killed in leopard attack; Due to fear, people awake overnight at Gopewadi in Paithan taluka | बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार; भीतीमुळे पैठण तालुक्यातील गोपेवाडी येथे नागरिकांचे रात्रभर जागरण 

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार; भीतीमुळे पैठण तालुक्यातील गोपेवाडी येथे नागरिकांचे रात्रभर जागरण 

googlenewsNext
ठळक मुद्देगुरुवारी पिकांना पाणी देण्यासाठी  भारत ठेणगे शेतात गेले होते. शिवारातील शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

- अंकुश वाघ

पैठण (औरंगाबाद) : तालुक्यातील गोपेवाडी शिवारात बिबट्याने हल्ला केल्याने पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री (दि.६) ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातारण आहे. भारत मुरलीधर ठेणगे (६२), असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गुरुवारी पिकांना पाणी देण्यासाठी  भारत ठेणगे शेतात गेले होते. मात्र, गोपेवाडी शिवारातील शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने सदर शेतकऱ्यावर हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बिबट्याने अक्षरश: शेतकऱ्याच्या शरीराच्या तुकडे केले. दरम्यान, सायंकाळ झाली तरी वडील शेतातून घरी येत नसल्याने शेतकऱ्याचा मुलगा त्यांना शोधत शेतात गेला. मात्र, त्याला वडील दिसून आले नाहीत. यामुळे त्याने आजूबाजूला बघितले असता वडिलांची चप्पल आढळून आली. बाजूलाच रक्ताचा सडा पडलेला दिसून आला. हे रक्ताचे डाग उसात जात असल्याचे दिसताच त्याने आरडाओरडा केला. यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. 

तेव्हा नागरिकांच्या डोळ्यांदेखत बिबट्याने मयत शेतकऱ्याला उसाच्या शेतात ओढून नेले. येथील शेतकऱ्यांनी लाड्या-काठ्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, बिबट्या हाती लागला नाही. अखेर बऱ्याच परिश्रमांनंतर सदर शेतकऱ्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत दाट उसामध्ये आढळून आला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, येथील नागरिकांची बिबट्याच्या भीतीमुळे झोप उडाली होती.

प्रेत पुन्हा पळविले 
मयत शेतकऱ्याचे प्रेत एका उसाच्या शेतात आढळून आल्यावर ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये फोटो काढले होते. तथापि तो हिंस्त्र प्राणी पुन्हा येण्याची शक्यता वाटल्याने ग्रामस्थ घटनास्थळी न थांबता बाजूला गेले. थोड्या वेळाने ग्रामस्थांची संख्या वाढल्यानंतर सर्व जण पुन्हा घटनास्थळी गेले असता प्रत्यक्षदर्शी हादरूनच गेले कारण सदर प्राण्याने शेतकऱ्याचे प्रेत पुन्हा फरपटत नेल्याचे दिसून आले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

वन विभागाचे पथक घटनास्थळी 
गोपेवाडी येथील घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरा वनविभागाचे गोविंद वैद्य पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अखेर रात्री १० वाजता या शेतकऱ्याचे प्रेत छिन्नविच्छिन्न अवस्थेत उसाच्या शेतात आढळून आले. प्रेताचे केवळ धड शिल्लक होते. विशेष म्हणजे वन अधिकाऱ्यांनी साक्षात बिबट्याला बघितले. मात्र, ते काही करू शकले नाही. या बिबट्याचा सुगावा घेण्यासाठी रात्री उशिरा ड्रोन कॅमेरा वापरण्यात आला. मात्र, उसाचे क्षेत्र जास्त असल्याने काहीही उपयोग झाला नाही.

Web Title: Farmer killed in leopard attack; Due to fear, people awake overnight at Gopewadi in Paithan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.