शेतकऱ्याची नजर ऊस शेतीच्या पलिकडे
By Admin | Published: December 19, 2015 11:15 PM2015-12-19T23:15:57+5:302015-12-19T23:44:59+5:30
उस्मानाबाद : पावसाअभावी जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. दुष्काळाची ही तीव्रता वाढविण्यात मागील काही वर्षांत जिल्ह्यात फोफावलेल्या ऊस उत्पादनाचा वाटाही मोठा आहे.
उस्मानाबाद : पावसाअभावी जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. दुष्काळाची ही तीव्रता वाढविण्यात मागील काही वर्षांत जिल्ह्यात फोफावलेल्या ऊस उत्पादनाचा वाटाही मोठा आहे. त्यामुळेच कृषी विभागाच्या वतीने पीक पध्दती बदलण्यासाठी ऊस शेतीच्या पलिकडे हे अभियान राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कळंब तालुक्यातील शेतकऱ्याने तब्बल तीन एकरावर ड्रीपच्या माध्यमातून तुरीचे उत्पादन घेतले असून, तुरीची वाढ पाहता हा प्रयोग सर्वार्थाने यशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.
मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळेच बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. शहरांसह वाड्या-वस्त्यांसमोरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असून, पिकांची अवस्था दयनीय आहे. भूगर्भातील पाणीपातळीतही अनेक ठिकाणी सुमारे पंधरा मिटर एवढी विक्रमी घट झालेली आहे. मात्र, त्यानंतरही नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी उसाच्या मागे लागल्याचे चित्र दिसून येत होते. इतर पिकांच्या तुलनेत उसाला जास्तीचे पाणी लागते. दुष्काळी जिल्ह्यात अशा पध्दतीने पाण्याचा होत असलेला उपसा पाहता भविष्यात येथील पूर्ण शेती व्यवस्थाच उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने ‘ऊस शेतीच्या पलिकडे’ हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील अनेक शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. कळंब तालुक्यातील आंदोरा येथील दिलीप तांबारे या प्रगतशील शेतकऱ्यानेही या उपक्रमाच्या माध्यमातून पीक पध्दतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. तांबारे यांच्याकडे पूर्वी मोठ्या प्रमाणात ऊस तसेच टरबूज होता. यंदा मात्र त्यांनी उसाचे क्षेत्र कमी केले. याबरोबरच टरबूजही बाजुला करून तेथे तुरीची लागवड केली. टरबुजासाठी त्यांनी ड्रीप घेतलेले होते. याच ड्रीपच्या साह्याने त्यांनी तुरीचे तीन एकर क्षेत्र फुलविले आहे. सद्यस्थितीत ही तूर सहा ते साडेसहा फुटापर्यंत वाढली असून, अत्यल्प पाण्यावर तुरीची भरघोस वाढ झाल्याने त्यांचा उत्साह वाढलेला आहे.
पूर्वी उसाला पंधरा दिवसाआड पाणी द्यावे लागत होते. मात्र, महिन्यातून एकदा पाणी देवूनही तुरीचे क्षेत्र हिरवेगार आहे. विशेष म्हणजे, तुरीसाठी केवळ फवारणीचा खर्च झालेला असल्याने अत्यंत कमी खर्चात त्यांना जास्तीचे उत्पादन मिळणार आहे. तीन एकर क्षेत्रात अंदाजे ४५ ते ५० क्विंटल तूर निघेल, असा अंदाज असून, तुरीचा सध्याचा भाव पाहता उसापेक्षा कितीतरी अधिक उत्पादन अपेक्षित असल्याचे तांबारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उस्मानाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यात अशा रितीने पीक पध्दती बदलल्यास शेतकऱ्यांना फायदा तर होणारच आहे. याबरोबरच लाख मोलाचे पाणीही वाचणार आहे.