नाईलाजाने कापूस विकून दिली लाच; शेतकऱ्यास छळणाऱ्या तलाठ्यास एसीबीने पकडले रंगेहाथ
By राम शिनगारे | Published: April 25, 2023 06:18 PM2023-04-25T18:18:24+5:302023-04-25T18:19:17+5:30
जालना एसीबीच्या पथकाने तलाठ्यास कार्यालयातच लाच घेताना पकडले
छत्रपती संभाजीनगर : मुलगा, वडिलाच्या वाटणीतील जमीन मुलाच्या नावे करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्यास ३ हजार रूपये घेताना कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई जालना येथील एसीबीच्या पथकाने शेकटा येथे मंगळवारी केली. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात तलाठ्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
सविता प्रदीप पाटील (३०, तलाठी सजा : शेकटा, ता. छत्रपती संभाजीनगर) असे लाच घेणाऱ्या आरोपी तलाठ्याचे नाव आहे. जालना एसीबीचे उपविभागीय अधिकारी सुदाम पाचोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकऱ्याच्या आई-वडिलांच्या नावे करंजगाव शिवारात साडेदहा एकर जमीन आहे. त्या जमिनीपैकी ६८ गुंठे जमीन वारसा हक्क वाटणी पत्रकाप्रमाणे मुलाच्या नावावर करायची होती. त्यासाठी तलाठी सविता पाटील हिने १५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत १० हजार रुपयात व्यवहार ठरला. शेतकऱ्याने दीड महिन्यापूर्वी ५ हजार रुपये दिले.
उर्वरित पैसे देण्यासाठी मागील काही दिवसांपासून तलाठ्याने तगादा लावला होता. पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याने घरातील कापूस विक्री काढला. कापूस विकल्यानंतर त्याचे पैसे मिळेपर्यंतही तलाठी पैशासाठी थांबत नव्हता. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्याने जालना एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार जालना एसीबीने शेकटा येथील तलाठ्याच्या कार्यालयातच ३ हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई जालना एसीबीचे उपविभागीय अधिकारी सुदाम पाचोरकर, हवालदार गजानन घायवट, गणेश बुजाडे, कृष्णा देठे, गणेश चेके, चालक प्रविण खंदारे यांनी पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनात केली.