औंढा तालुक्यात नापिकीस कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 05:29 PM2018-10-30T17:29:21+5:302018-10-30T17:54:31+5:30
तालुक्यातील दरेगाव येथील शेतकऱ्याने नापिकीस कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : तालुक्यातील दरेगाव येथील शेतकऱ्याने नापिकीस कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. प्रल्हाद मसाजी दांडेगावकर (५४) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांचा सोमवारी सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
प्रल्हाद दांडेगावकर यांनी कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून रविवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतात विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हिंगोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सोमवारी रात्री ८.३० वाजता त्यांची प्राणजोत मालवली. त्यांच्यावर बँक व खाजगी सावकाराचे कर्ज होते. तसेच शेतामध्ये विहिर खोदूनही पाणी लागले नाही, सततची नापीकी या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांचा मुलगा भिमराव दांडेगावकर यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.