शेतकरी विमा कंपनीच्या विरोधात जाणार न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:02 AM2021-06-30T04:02:57+5:302021-06-30T04:02:57+5:30
लाडसावंगी : परिसरात मागील वर्षी मृग बहाराचा फळबाग विमा शेतकऱ्यांनी काढला होता. मात्र, मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप विमा ...
लाडसावंगी : परिसरात मागील वर्षी मृग बहाराचा फळबाग विमा शेतकऱ्यांनी काढला होता. मात्र, मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप विमा न मिळाल्याने शेतकरी आता न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीला लागले आहेत.
लाडसावंगी परिसरात फळबाग उत्पादक शेतकऱ्याची संख्या मोठी आहे. हा परिसरात मोसंबी व डाळिंबाचे माहेरघर समजला जातो. लहरी निसर्गामुळे नुकसान भरपाई मिळावी, या उद्देशाने शेतकरी दरवर्षी विमा काढतात. मागील वर्षी शेतकऱ्यांनी मृग बहाराचा मोसंबी व डाळिबांचा विमा शेतकऱ्यांनी काढला होता. मागील वर्षी अतिवृष्टी होऊन परिसरात अकराशे मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली होती. यामुळे डाळिंब व मोसंबीची फळे झाडावरच सडली होती. फळबागांचेही मोठे नुकसान झाले होते. यासाठी राज्य सरकारने अल्पमदतही दिली. मात्र, विमा कंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. विमा मंजूर न झाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही विमा काढलेला नाही. मागील वर्षीचा पीक विमा मंजूर करावा, अन्यथा शेतकरी आता न्यायालयात जाण्याची तयारी करीत आहेत.
चौकट
कंपनीने आश्वासन पाळले नाही
मागील वर्षी आम्ही डाळिंब व मोसंबीचा विमा भरला होता. अतिवृष्टीने नुकसान होऊनही विमा कंपनीने विमा मंजूर केला नाही. शासनाने शेतकऱ्यांना फळबागांची नुकसान भरपाई दिल्यास, आम्ही पण विमा मंजूर करू, असे विमा कंपनीच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले होते. परंतु शासनाने मदत देऊनही कंपनीने आम्हाला विमा मंजूर केला नाही. त्यामुळे आम्ही शेतकरी एकत्र येऊन संबंधित कंपनीच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती शेलूद येथील डाळिंब उत्पादक शेतकरी मधुकर चौधरी व लाडसावंगी येथील मोसंबी उत्पादक शेतकरी अजिनाथ शिंदे यांनी दिली.