शेतकरी महिलांच्या सशक्तीकरणाची गरज
By Admin | Published: March 11, 2017 12:22 AM2017-03-11T00:22:11+5:302017-03-11T00:23:59+5:30
उस्मानाबाद : शेतकरी महिला सशक्त झाल्या तर समाजातील अनेक प्रश्न सहजरीत्या सुटतील, असे मत स्वयम् शिक्षण प्रयोगच्या प्रेमा गोपालन् यांनी व्यक्त केले़ ‘
उस्मानाबाद : जमिनीचे आणि सर्वसामान्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती पध्दतीची गरज आहे़ हे काम महिला योग्यप्रकारे करू शकतात म्हणून शेतकरी महिलांना प्रोत्साहन देण्यात येत आहे़ शेतकरी महिला सशक्त झाल्या तर समाजातील अनेक प्रश्न सहजरीत्या सुटतील, असे मत स्वयम् शिक्षण प्रयोगच्या प्रेमा गोपालन् यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़ ‘व्हेली’सेंटरच्या माध्यमातून महिलांमधील राजकीय, सामाजिक नेतृत्व विकसित करण्यावरही भर देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़
स्वयम् शिक्षण प्रयोगच्या वतीने शहरातील आनंदनगर भागातील सांस्कृतिक सभागृहात आयोजित महिला मेळाव्यानिमित्त त्या आल्या होत्या़ यावेळी ‘लोकमत’शी वार्तालाप करताना प्रेमा गोपालन् म्हणाल्या, १९९३ च्या भूकंपानंतर आमच्या संस्थेने काम सुरू केले़ महिलांच सर्वांगीण विकास हा ध्यास घेऊन आजवर उस्मानाबादसह लातूर, बीड, वाशीम, सोलापूर व नांदेड जिल्ह्यात पाच हजारापेक्षा जास्त बचतगट तयार करण्यात आले असून, या अंतर्गत एक लाखाच्या जवळपास महिला जोडल्या गेल्याचे त्यांनी सांगितले.
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात महिलांकडे शेतकरी म्हणून न पाहता एक मजूर म्हणून पाहिले जाते़ ही बाब पाहता आम्ही त्या शेतकरी महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काम सुरू केले़ त्यांच्या शेतातील एक ते दोन एकर जमीन स्वत:च्या निर्णय क्षमतेवर कसण्यासाठी घेण्याची अट घालून त्यांना शेती कसण्यासाठी पुढे आणले आहे़ एका हंगामात एकच पीक न घेता घरात लागणारे अन्नधान्य, भाजीपाला घेण्याबाबत सूचित केले आहे़ आजवर राज्यात अशा प्रकारे सात हजार महिलांनी स्वत: शेती कसण्यासाठी घेतली असून, त्यामुळे कुटुंबातील अनेक प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत़ रासायनिक शेतीमुळे पर्यावरणावर आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे़ त्यामुळे आम्ही सेंद्रीय शेतीकडे महिलांना वळविले आहे़ सेंद्रीय शेतीमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळून विषमुक्त अन्नधान्यही मिळणार आहे़ दुष्काळी परिस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यातील १०० महिलांना सोबत घेऊन प्रशासनाने ३०० गावात काम केले आहे़ शासकीय योजना शेतकरी, शेतमजुरांपर्यंत पोहोचविणे, जनजागृती करणे, दरडोई उत्पन्न वाढवून होणारे स्थलांतर रोखण्याचे यशस्वी कामही करण्यात आले आहे़ महिलांना सोबत घेऊन राबविलेल्या योजनांचा प्रयोग हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरल्याचेही त्यांनी सांगितले़
उस्मानाबाद, सोलापूर व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार ‘व्हेली’ सेंटर सुरू करण्यात आले आहेत़ त्याशिवाय ‘एसएसबी’ सेंटर ही सुरू करणार आहोत़ या माध्यमातून महिलांमधील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व गुणांना वाव देऊन त्यांना प्रगल्भ बनविण्यात येणार आहे़ पुढील तीन वर्षात देशात ५०० सेंटर सुरू करून एक लाख महिलांमधील नेतृत्वाला वाव देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगत, महिलांच्या विकासाशिवाय देशाची प्रगती अशक्य असल्याचे त्या म्हणाल्या.