शेततळ्यांचे उद्दीष्ट दीडपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 12:17 AM2016-05-11T00:17:44+5:302016-05-11T00:20:49+5:30
लातूर : मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यात शेततळ्यांचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे़ १ हजार ९२३ शेततळ्याचे उद्दीष्ट असतानाही
लातूर : मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यात शेततळ्यांचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे़ १ हजार ९२३ शेततळ्याचे उद्दीष्ट असतानाही एकूण ३ हजार ९४४ शेतकऱ्यांचे अर्ज कृषी कार्यालयाकडे आॅनलाईन दाखल झाले आहेत़ टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एकूण उद्दीष्टापेक्षा दीडपट शेततळी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्यामुळे आणखी ५० टक्के शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळणार आहे़
मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळे घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या प्रक्रियेला तात्काळ मंजुरी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ लातूर जिल्ह्यात कृषी विभागाअंतर्गत सुरु केलेल्या शेततळ्यासाठी १५ बाय १५ बाय २३, ३० बाय ३० बाय ३ या दोन साईजमध्ये शेततळ्याचा क्रायटेरिया ठरविण्यात आला आहे़ मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी ७/१२, ८/अ, बँक पासबुक व २० रुपये फिस भरून आॅनलाईन नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे़
एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत ३ हजार ९४४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ दिलेल्या १ हजार ९२३ शेततळ्याच्या उद्दीष्टापेक्षा दीड पटीने शेततळ्यास मंजूरी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे़ त्यामुळे मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी आॅनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांतून या प्रक्रियेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे़ अद्यापपर्यंत १ हजार ९२३ शेततळ्यांना मंजुरी दिली आहे़
या संख्येच्या दीडपट आणखी १ हजार शेततळ्यांना मंजुरी दिली जाणार आहे़
या शासनाच्या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याला आधार मिळणार आहे़ शेततळ्याला मंजुरी मिळाल्यानंतर शेततळ्याची वर्क आॅर्डर निघणार व त्यानंतर शेततळे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले़ त्यामुळे मागेल त्याला शेततळे या योजनेला जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे़ शेततळ्याचे शासन अनुदानातून होत नसतानासुध्दा शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे़ वाढीव अनुदानाची मागणी शेतकऱ्यातून होत आहे़ (प्रतिनिधी)