उरलेल्या तुरीचे आम्ही करायचे काय? औरंगाबादच्या शेतक-यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:39 AM2018-02-06T00:39:37+5:302018-02-06T11:44:21+5:30
शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिहेक्टर केवळ साडेपाच क्विंटल तूर खरेदी केली जात असल्याने संतप्त शेतक-यांनी सोमवारी (दि.५) जाधववाडीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिहेक्टर केवळ साडेपाच क्विंटल तूर खरेदी केली जात असल्याने संतप्त शेतक-यांनी सोमवारी (दि.५) जाधववाडीतील तूर खरेदी केंद्रावर गोंधळ घातला. आधीच हंगाम संपत आलेला असताना शासनाने तूर खरेदी सुरू केल्यामुळे नाराज शेतक-यांनी ‘आता आम्ही उरलेल्या तुरीचे करायचे काय?’ असा सवाल करत रोष व्यक्त केला.
जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘नाफेड’च्या वतीने शनिवारी (दि.३) तूर खरेदीला सुरुवात झाली. शासनातर्फे यंदा बोनससह प्रतिक्विंटल ५४०० रुपये हमीभाव दिला जात आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर सोमवारी संतोष भवर हे शेतकरी केंद्रावर ११ क्विंटल तूर विक्री करण्यास घेऊन आले. मात्र, शासनाच्या आदेशानुसार त्यांची केवळ तीन क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
असाच अनुभव इतर शेतक-यांनाही आला. त्यांनी केंद्रावरील अधिका-यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यामुळे सोमवारी केवळ १६५ क्विंटल तूर खरेदी झाली़
‘शासन जर पूर्ण तूर खरेदी करणार नसेल तर बाकीच्या तुरीचे आम्ही काय करायचे? फेकून द्यायची?’ अशा शब्दांत शेतक-यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. अडत बाजारामध्ये तुरीला ४१०० ते ४३०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे व्यापा-याला तूर विक्री केल्यानंतर शेतक-यांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे ते नाराज झाले आहेत. ‘हमीभावाने तूर खरेदी केली’ केवळ एवढेच दाखविण्यासाठी हे सुरू आहे. उरलेली तूर व्यापा-यांकडेच जावी हाच सरकारचा डाव असल्याचा आरोप शेतक-यांनी केला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अतिरिक्त भाव जाहीर केल्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, एकरी दोन क्विंटल तूर खरेदीच्या शासन धोरणाने शेतकरी हैराण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘केंद्रावर चाळणी यंत्र असतानाही आम्हाला खाजगी व्यावसायिकांकडून चाळून आणण्यास सांगितले जाते. त्यासाठी प्रतिक्विंटलमागे दोनशे ते अडीचशे रुपये खर्च होतो, असा तक्रारींचा पाढाच शेतक-यांनी मांडला.