सोयाबीन खरेद्री केंद्रावर शेतक-यांचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:05 PM2017-11-14T23:05:45+5:302017-11-14T23:05:57+5:30
अंबड : येथील नाफेड केंद्रावर ग्रेडरने चांगल्या सोयाबीनला गुणवत्तेचे निकष लावून सुमारे चारशे क्विंटल सोयाबीन खरेदीस अपात्र ठरवली. त्यामुळे ...
अंबड : येथील नाफेड केंद्रावर ग्रेडरने चांगल्या सोयाबीनला गुणवत्तेचे निकष लावून सुमारे चारशे क्विंटल सोयाबीन खरेदीस अपात्र ठरवली. त्यामुळे सोयाबीन विक्रीस आलेल्या संतप्त शेतक-यांनी मंगळवारी दुपारी केंद्रावर ग्रेडरसह येथील कर्मचा-यांना घेराव घातला.
अंबड येथील नाफेड केंद्रावर तीन नोव्हेंबरपासून सोयाबीन, मूग, उडीद खरेदी सुरू आहे. ३ ते १४ नोव्हेबरपर्यंत नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी केंद्रावर ४८ शेतक-यांनी साधारण ८०० ते ९०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. ८ नोव्हेंबरला मोबाईलवर प्राप्त संदेशावरून मच्छिंद्रनाथ चिंचोली, चिंचखेड, रामसगाव, चापडगाव, खालापुरी, देव हिवरा, खडका इ. गावांतील शेतकºयांनी मंगळवारी अंबड नाफेड खरेदी केंद्रावर साधारण ४०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणली. परंतु येथील ठिकाणी ग्रेडरने सोयाबीन खरेदीचे निकष तपासून सर्व सोयाबीन खरेदीस अपात्र ठरवले. त्यामुळे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकत्र जमवू लागले. सोयाबीन खरेदी करा असा आग्रह शेतक-यांनी धरला. परंतु परमेश्वर लांडगे व जिल्हा पणन अधिकारी पाटील यांनी सोयाबीनमध्ये आर्द्रता, फुटकळ दाणा, कचरा असल्याची कारणे सांगून सोयाबीन खरेदी करण्यास नकार दिला. एका शेतक-याची हेक्टरी ५.५४ क्विंटल सोयाबीन खरेदी केली जाईल, असे कृषी अधीक्षकांचे परिपत्रक दाखवून जास्त सोयाबीन खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या शेतक-यांनी नाफेड केंद्रासमोर आंदोलन सुरू केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.