जायकवाडीतून बंधाऱ्यात पाणी सुटताच ग्रामस्थांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 07:26 PM2019-02-08T19:26:37+5:302019-02-08T19:28:31+5:30
जायकवाडीतून गोदापत्रात पाणी सुटताच तालुक्यातील गोदाकाठच्या गावात ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला.
पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरण जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात आज सायंकाळी पाणी सोडण्यात आले. जायकवाडीतून गोदापत्रात पाणी सुटताच तालुक्यातील गोदाकाठच्या गावात ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. बंधाऱ्यासाठी धरणातून १५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे जायकवाडीचे धरण अभियंता संदीप राठोड यांनी सांगितले.
दि ७ रोजी जायकवाडीतून आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश शासन स्तरावर झाले होते. आज सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, धरण अभियंता संदीप राठोड, आदी उपस्थित होते.
४० गावांना होणार फायदा
आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या व गोदावरी पात्राच्या दोन्ही काठावरील पैठण, शेवगाव व गेवराई तालुक्यातील जवळपास ४० गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे.