केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 08:41 PM2019-01-10T20:41:26+5:302019-01-10T20:50:01+5:30
बागा वाळत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नागद परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बागा वाळत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या येथील बळीराजा अडचणीत सापडला असून, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केळी उत्पादन शेतकऱ्यांनी केली आहे.
नागद परिसरात यंदा दुष्काळी परिस्थिती असूनही मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून केळीचे पीक जगविले आहे; मात्र जगविलेल्या केळी पिकावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन निसटली आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यात आलेल्या कांद्याशिवाय मार्च व एप्रिलमध्ये लागवड केलेल्या मिरगाच्या बागांवरही करपाचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर काय उपाययोजना कराव्यात, याबद्दल शेतकरी संभ्रमात असून, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
येथील शेतकऱ्यांनी लागवडीपासून, आंतरमशागत ठिबक सिंचन प्रणाली, महागडी औषधी यावर मोठा खर्च केला आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात कापणीवर येणाऱ्या केळी बागांमध्ये डिसेंबरअखेर, तसेच जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीने केळी बागा करपत असून, केळीची पाने सुरुवातीला पिवळी पडत आहेत. त्यामुळे केळी पीक जवळपास हातातून गेले आहे. त्यातच सध्या भावात घसरण झाल्याने उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत.
केळीसाठी विमा का नाही
नागद परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिकाचा विमा काढता येत नाही. त्यामुळे नागदसह वडगाव, हरसवाडी, सायगव्हाण, बोरमळी, पांगरा, पांगरातांडा, नागदतांडा, बेलखेडा, सोनवाडी या परिसरातील शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे नुकसान होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चाळीसगाव व पाचोरा (जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून विम्याचा लाभ मिळत आहे, तर कन्नड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीसाठी विमा का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.
कृषी विभागाने मार्गदर्शन करावे
नागद व परिसरात केळी पिकावर मोठ्या प्रमाणावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे; मात्र तरीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.