शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून शेतकऱ्याची हत्या; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:19 PM2019-05-22T12:19:44+5:302019-05-22T12:22:04+5:30
शेतीच्या जुन्या वादातून झाला घटना
हिंगोली : तालुक्यातील राहुली बु. येथे शेतीच्या वादातून एकाची संगनमत करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शंकर लक्ष्मण डोरले (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी सात जणांविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण डोरले यांचे शेतीच्या प्रकरणात काही शेजाऱ्यांसोबत जुने वाद आहेत. यावरून तीन महिन्यांपूर्वी त्यांचे भांडणही झाले होते. मंगळवारी (दि. २१ ) सायंकाळी लक्ष्मण त्यांच्या शेतात एकटे असताना शेजाऱ्यांनी शेतीच्या वादातून परत वाद सुरु केला. यातून सहा ते सात जणांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्यावर कुर्हाडीने वार करत गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी ए.जी. खान यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी लक्ष्मण गणपती डोरले यांच्या फिर्यादीवरून गणेश रामकिशन डोरले, अंबादास उर्फ बाबुशा नामदेव घोंगडे, विठ्ठल नामदेव घोंगडे, ज्ञानेश्वर किशन बोरगड, मारुती विठ्ठल डोरले, रामकिशन पंडिता डोरले, नामदेव तुकाराम घोंगडे ( सर्व राहणार राहुली बु. ) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि सुडके हे करीत आहेत. यातील चौघांना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.