शेती क्षेत्रात काळानुसार बदल न झाल्यानेच शेतकऱ्यांच्या मुलांचा शेतकरी होण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:51 PM2019-02-02T23:51:07+5:302019-02-02T23:52:21+5:30
पैठण : अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पैठण : काळानुसार शेतीत बदल न झाल्याने शेतकºयाचा मुलगा शेतकरी होण्यास नकार देत आहे, असे प्रतिपादन कवी इंद्रजित भालेराव यांनी अ.भा. पाचव्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारपासून दोनदिवसीय मराठी शेतकरीसाहित्य संमेलनास येथील माहेश्वरी भक्त निवासात सुरुवात झाली. यावेळी जालिंदर आडसूळ, कैलास तवार, गीता खांडेभराड, राजेश राजुरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष अॅड. सतीश बोरुळकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, मनीषा रिठे (वर्धा) आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना इंद्रजित भालेराव यांनी शेतकºयांचा प्रश्न साहित्यात का आला नाही, वकिलाचा मुलगा वकील, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, उद्योजकाचा मुलगा उद्योजक होतो, मात्र शेतकºयाचा मुलगा शेतकरी होण्यास का तयार नाही, याचे कारण म्हणजे शेती पारंपरिक राहिली. तंत्रज्ञानाचा स्वीकार शेतीने केलाच नाही. याच कारणाने शेतीकडे शेतकºयाचा मुलगा वळण्यास तयार नाही. ग्रामीण भागात दुष्काळ असून अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण होते. यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळतो, तसेच गावात शेती कशी चाललेली आहे, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
या संमेलनात शेतकºयांना शेतीविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली. तसेच तळागाळातील शेतकºयापर्यंत संमेलनाचे उद्दिष्ट व त्याची माहिती पोहोचविण्यासाठी संमेलनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या. मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळ रूप धारण केले आहे. तसेच शेतकºयांच्या समस्यांवर उपाययोजना शोधण्यासंदर्भात शासकीय आणि राजकीय आघाड्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. समाजाचा आरसा समजल्या जाणाºया साहित्य क्षेत्रातसुद्धा परिस्थिती वेगळी नसल्याने साहित्य क्षेत्रातील शेती प्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून, या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न या संमेलनाच्या पाठीमागे आहे, असे अॅड. सतीश बोरूळकर यांनी सांगितले.