शेतकऱ्यांची चिंता वाढली; मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:27 PM2020-03-03T12:27:02+5:302020-03-03T12:29:04+5:30
नोव्हेंबर २०१९ च्या पूर्वार्धापर्यंत पाऊस झाल्यामुळे रबी हंगामात पेरणीचे प्रमाण मोठे आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बीड, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश महसूल मंडळांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. नोव्हेंबर २०१९ च्या पूर्वार्धापर्यंत पाऊस झाल्यामुळे रबी हंगामात पेरणीचे प्रमाण मोठे आहे. खरिपातील नुकसानभरपाई रबीतून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असून, त्यावरही गारपीट आणि अवकाळीचे संकट आले आहे.
अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी पिकांसह आंब्याचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सर्वाधिक फटका बीड तालुक्यातील राजुरी, पाली (२५ मि.मी.), लिंबा गणेश (८.७५ मि.मी.), पाटोदा तालुक्यातील पाटोदा (१३.७५ मि.मी.), दसखेड (८ मि.मी.), आष्टी तालुक्यातील थेरला (११ मि.मी.), दावलवडगाव (२४. ७६ मि.मी.) या मंडळांमधील गावांना फटका बसला.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात पावसाची मोठी हजेरी होती. तालुक्यातील वाकोडी (१३.७५ मि.मी.), आखाडा (१९ मि.मी.), डोंगरकडा (१२.२५ मि.मी.), वारंगा (१३ मि.मी.) मंडळात जोरदार पाऊस झाला.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी (१४.७५ मि.मी.) व अंबड तालुक्यातील वडीगोद्री (९ मि.मी.) व सुखापुरी मंडळामध्ये ७.७५ मि.मी. पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पिंपरखेड (१३.५० मि.मी.), लोहा (८.७५ मि.मी.), किनवट (९.५० मि.मी.), हिमायतनगर तालुक्यातील जावळगाव (११.२५ मि.मी.) असा मोठा पाऊस झाला. लातूर जिल्ह्यालाही अवकाळीने फटका दिला. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा (१३ मि.मी.), उदगीरमधील नागलगाव (८.५० मि.मी.), मोहा (८ मि.मी.), रेणापूरमधील पेनगाव (१३.२५ मि.मी.), केरापूर (११.७५ मि.मी.) या मंडळांमध्ये मोठा पाऊस झाला.
नुकसानीचे पंचनामे होणार
राज्यासह औरंगाबाद विभागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. शेती पिकांच्या नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज असून, कृषी विभाग व महसूल विभाग यांच्याकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. आधीच दुष्काळी असलेल्या मराठवाड्याला काही वर्षांपासून गारपीट आणि अवकाळीचा फटका बसतो आहे. तीन महिन्यांपूर्वी अवकाळीने खरिपांची पिके हिरावून घेतली. आता रबी पिकांवर अवकाळीचे संकट आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.