डाळींबाच्या बागेत आंतरपिक घेऊन शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:37 PM2018-12-08T20:37:16+5:302018-12-08T20:37:31+5:30

यशकथा :  खर्च वजा जाता चार महिन्यांत सुमारे २० लाख रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

Farmers earn millions by taking an intercrop in pomegranate garden | डाळींबाच्या बागेत आंतरपिक घेऊन शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई 

डाळींबाच्या बागेत आंतरपिक घेऊन शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई 

googlenewsNext

- बाळासाहेब काकडे, (श्रीगोंदा, जि.अहमदनगर)

दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना कमी पाण्यावर श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील राजेंद्र झुंबर काकडे यांची चार एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग आहे. या बागेत त्यांनी गॅलन वांगी व झेंडूचे आंतरपीक घेऊन पहिल्याच महिन्यात दहा लाख रुपये कमविले. खर्च वजा जाता चार महिन्यांत सुमारे २० लाख रुपयांपर्यंतचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

राजेंद्र काकडे यांना वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. त्यामुळे जबर इच्छा शक्ती असूनदेखील सुधारित पद्धतीने शेती करण्यास अडचणी होत्या. अशातच शेजारी राहणारे तुकाराम डुबल यांची चार एकर शेती १२ वर्षांच्या कराराने त्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहे. तीन महिन्यांपूर्वी भगवा जातीच्या डाळिंबाची त्यांनी लागवड केली.

डाळिंबाची लागवड केल्यानंतर पाण्याचे नियोजन केले. सूक्ष्म खते पाण्यासाठी देण्यासाठी स्वतंत्र ठिबक सिंचनाचा वापर केला. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यामुळे पिकांमध्ये रोग प्रतिबंधक शक्ती वाढली. त्यामुळे पिकांची जोमाने वाढ झाली आणि अपेक्षित उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. डाळिंबात झेंडूची लागवड केल्यामुळे आर्थिक लाभाबरोबर निमॉटोड रोगाचा प्रतिबंध करणे शक्य झाले. डाळिंबाच्या दोन ओळीमध्ये जे १४ फुटांचे मोकळे अंतर होते. त्यामध्ये गॅलन जातीच्या वाग्यांची लागवड केली. या आंतरपिकाचा फायदा दुहेरी पद्धतीने झाला.

यामुळे बागेत वाढणाऱ्या तणनाशकाला आळा बसला. याचा परिणाम पिकांच्या जोमदार वाढीवर झाला. बाजारपेठेचा अंदाज या आंतरपिकाचे नियोजन केले होते. त्यासाठी सुमारे चार लाख गुंतवणूक केली. त्या शेतात गहू, ज्वारी घेतली जात होती. त्याच मळ्यात डाळिंब आणि झेंडू, वांग्यांनी मळा बहरला आणि वांग्याला ३० ते ३५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. मुंबईच्या बाजारपेठेत राजेंद्र काकडे यांच्या वांग्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने चांगला भाव मिळत आहे. झेंडूलाही चांगला भाव मिळाला. शिवाय झेंडूच्या झाडांचा डाळिंबावरील निमॉटोड रोखण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. गेल्या महिनाभरातच या आंतरपिकातून १० लाखांचे उत्पन्न निघाले. आणखी २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. उत्पादन वजा जाता चार महिन्यांत २० लाख रुपयांपर्यंत नफा मिळविण्याचे आम्ही नियोजन केल्याचे काकडे यांनी सांगितले.

चालू वर्षी श्रीगोंदा तालुक्यात कमी पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. तालुक्यातील खरीप हंगाम गेला. रबीच्या पेरण्या झाल्या नाहीत. शेतकऱ्यांची झुंज फळबागा जगविण्यासाठी चालू झाली आहे. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीचा राजेंद्र काकडे यांनी केलेले नियोजन हा कौतुकाचा विषय ठरला आहे. पाणीटंचाईचे आव्हान पेलून डाळिंबात आंतरपीक घेतले. पाण्याच्या अडचणीतही धीर सोडला नाही. कमीत कमी खर्चात जास्तीचे उत्पन्न मिळविण्याचे ध्येय ठेवल्याचे राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

Web Title: Farmers earn millions by taking an intercrop in pomegranate garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.