शेतकऱ्यांचे डोळे वरुणराजाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:04 AM2021-07-09T04:04:06+5:302021-07-09T04:04:06+5:30
केळगाव : शिवारात पावसाने उघडीप दिल्याने खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. शेतकऱ्यांचे डोळे वरुणराजाकडे लागले असून, ते आतुरतेने प्रतीक्षा ...
केळगाव : शिवारात पावसाने उघडीप दिल्याने खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. शेतकऱ्यांचे डोळे वरुणराजाकडे लागले असून, ते आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. जवळपास पंधरा दिवसांपासून पाऊस न आल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे.
रोहिण्यापाठोपाठ मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी पुढे पाऊस कायम राहीलच या आशेवर कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांची लागवड केली. पेरणीनंतर रिमझिम पाऊस राहिल्याने जमिनीतून बीज अंकुरले. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची दडी पिकांच्या जीवावर उठली आहे. पाण्याअभावी पिके माना टाकू लागली आहेत. तर वाढत्या तापमानाने पिके जळू लागली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
मिरचीने दिला आधार
गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले. परंतु विहीर, नदी, तलावातील पाणीपातळी वाढल्याने रब्बी पिकांना तसेच मान्सूनपूर्व फळपिकांना लाभ झाला. त्यामुळे मान्सूनपूर्व मिरची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आता मिरचीला चांगला भाव मिळाल्याने दिलासा मिळू लागला आहे.
----