शेतकऱ्यांनी पेटविली मोसंबीची बाग

By Admin | Published: April 23, 2016 01:16 AM2016-04-23T01:16:31+5:302016-04-23T01:25:16+5:30

कचनेर : गेल्या चार-पाच वर्षांच्या दुष्काळात सर्वस्व पणाला लावून जगविलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याविना जळून जात आहेत.

Farmers garden cottage garden | शेतकऱ्यांनी पेटविली मोसंबीची बाग

शेतकऱ्यांनी पेटविली मोसंबीची बाग

googlenewsNext

कचनेर : गेल्या चार-पाच वर्षांच्या दुष्काळात सर्वस्व पणाला लावून जगविलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याविना जळून जात आहेत. त्यात सरकारने फळबागांना काहीही मदत न करण्याचे धोरण ठरविल्याने निराशेने आतल्या आत आक्रंदणाऱ्या शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी (दि.२२) पैठण तालुक्यातील पोरगाव चौफुली येथे दिसून आला. पाण्याअभावी जळून सरपण झालेली ३५० झाडांची मोसंबीची बाग शेतकऱ्यांनी स्वत:च्या हातांनी पेटऊन देत या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
नव्या सरकारने फळबागा वाचविण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. आघाडी सरकारने केलेल्या मदतीमुळे गेली तीन-चार वर्षे कशाबशा वाचलेल्या हजारो एकर बागा आता पाण्याअभावी जळून जात आहेत. फळबाग वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे आर्थिक पॅकेजची मागणी करूनसुद्धा सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात आक्रोश असून या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पोरगाव चौफुलीजवळील गट नंबर ५८ मध्ये किसन रावसाहेब गायकवाड यांच्या शेतातील मोसंबीची ३५० झाडे जाळून तीव्र निषेध केला. गायकवाड यांच्याकडे बागेत मोसंबीची ४५०० झाडे आहेत. पाण्याअभावी ही झाडे सुकत असून सुकलेली ३५० झाडे आजच्या आंदोलनात जाळून टाकण्यात आली.
शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संघटनेचे सर्व कार्यकर्ते व शेतकरी मोसंबीच्या बागेत जमा झाले. काट्याकुट्या जमा करून मोसंबीच्या झाडांची होळी करण्यात आली. धुराचे लोट गगनापर्यंत भिडले.
त्यामुळे परिसरात सर्वत्र धूरच धूर दिसत होता. झाडे पेटविताना शेतकरी किसन गायकवाड यांचे डोळे भरून आले व त्यांना हुंदके अनावर झाले. कडाक्याचे ऊन आणि सोसाट्याच्या वाऱ्याने क्षणार्धात आग पेटली व दहा-पंधरा मिनिटात बागेचे अवशेष राखेत बदलले.
राज्यात मोसंबीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातील शेकडो एकर मोसंबी बागांचे सरपण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मुला-मुलींचे लग्न कसे होणार, शिक्षणाचा खर्च, बँकेचे कर्ज कसे फेडावे, गृहखर्च कसा चालवावा असे नाना प्रश्न उपस्थित होत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे.
याप्रसंगी ताराचंद (किसन) गायकवाड, शिवा गायकवाड, डोणगावचे सरपंच सुनील तांबे, प्रभाकर नीळ, गोरख नीळ, कचरू नीळ, अतुल चव्हाण, शंकर नीळ, रामनाथ राठोड व परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करावं तरी काय, आम्ही हतबल झालोय...
लेकरापेक्षाही अधिक जीव आम्ही या बागांना लावला. लेकरांच्या तोंडातील घास काढून बागा वाढविल्या. माझी बाग लावून केवळ १० वर्षे झाली, अजून किमान ती १० वर्षे जगली असती. मागील चार वर्षे दुष्काळ व सततची पाणीटंचाई, त्यामुळे बेताचेच उत्पादन झाले. उत्पादन खर्चही भागला नाही. डोक्यावरील कर्ज वाढते आहे. दररोज सरपण होत जाणारी बाग पाहून तीळतीळ मरण्यापेक्षा टाकली एकदाची जाळून. एक दिवस रडून गप्प बसता येईल. -किसन गायकवाड, शेतकरी
कधी येणार पंतप्रधानांचे पथक
अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तातडीने विशेष पथक पाठविण्याची घोषणा करून पंधरा दिवस उलटले आहेत; परंतु अद्यापही पथक आले नाही. हे पथक कधी येणार? सरकारला माहिती कधी सादर करणार? तोपर्यंत या फळबागा वाचतील काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. सरकारने तातडीने दुष्काळ निवारण्यासाठी पावले उचलावीत आणि शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी, फळबागा वाचविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी आमची मागणी आहे.
जागवल्या जुन्या स्मृती
मराठवाड्यातील मोसंबीच्या बागा जगविण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारातील केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जालना-औरंगाबाद व मराठवाड्यातील जिल्ह्यात दौरा काढून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. फळबागांची प्रत्यक्ष पाहणी करून हेक्टरी ३० हजार रुपयांची, मर्यादित दोन हेक्टरपर्यंत मदत केली होती. त्यामुळे २५ ते ३० टक्के बागा जगू शकल्या. शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घातले. ज्यांना पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी ठिबक पद्धतीने पाणी देऊन बागा वाचविल्या.

 

Web Title: Farmers garden cottage garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.