विजेच्या खांबाला चिटकल्याने शेतकऱ्याचा हात निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:09 AM2021-01-08T04:09:39+5:302021-01-08T04:09:39+5:30
लाडसावंगी : येथून जवळ असलेल्या आडगाव सरक येथील शेतकरी शेतात बकऱ्या चारत असताना विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला त्यांचा ...
लाडसावंगी : येथून जवळ असलेल्या आडगाव सरक येथील शेतकरी शेतात बकऱ्या चारत असताना विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला त्यांचा हात लागला. यामुळे खांबाला चिकटून सदर शेतकरी गंभीर जखमी झाला असून, एक हात कापावा लागला, तसेच दोन्ही पाय व शरीर भाजले आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर शेतकऱ्याला कायस्वरुपी जायबंदी व्हावे लागले आहे. रुस्तुम पठाडे असे शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना २७ डिसेंबर रोजी घडली आहे.
आडगाव सरक येथील शेतकरी रुस्तुम पठाडे हे २७ डिसेंबर रोजी गट क्रमांक ८९ मध्ये शेतात बकऱ्या चारीत होते. शेतातून ११ केव्ही विजेची तार गेली आहे. त्या तारेच्या खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. पठाडे यांचा हात त्या खांबाला लागताच ते खांबाला चिकटले. हे लक्षात येताच इतर शेतकऱ्यांनी त्यांना खांबापासून अलग केले. त्यांना गंभीर अवस्थेत औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा डावा हात निकामी झाल्यामुळे कापावा लागला असून ,दोन्ही पाय मोठ्या प्रमाणात भाजल्याने अद्याप त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात लाईनमनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाईनमनच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आडगावच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
चौकट
करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आडगाव सरक येथील गट क्रमांक ८९ मधून शेतीला वीज वाहून नेणारा सिमेंट पोल आहे. त्या पोलवर चिनी मातीची चिमणी नसल्यामुळे ती वायर लोखंडी रॉडला बांधली आहे. त्या जागेवर चिमणी बसवण्याची मागणी अनेक वेळा संबंधित लाईनमन श्रीपाद भोंडे यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सदर विद्युत खांबामध्ये वीज प्रवाहित होऊन रुस्तुम पठाडे यांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. त्यामुळे सदर लाईनमनवर करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोनि. संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सिराज पठाण, ताराचंद घडे करीत आहेत.
फोटो १) लाडसावंगीजवळील आडगाव सरक येथील करंट लागून जखमी झालेले रुस्तुम पठाडे घाटीत उपचार घेत आहेत.
2) वीज वाहून नेणाऱ्या खांबाला चिनी मातीची चिमणी नसल्याचे दिसत आहे.