उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 04:34 PM2018-11-02T16:34:16+5:302018-11-02T16:35:37+5:30
उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
- विजय सरवदे
औरंगाबाद : औरंगाबाद व जालना या दोन दुष्काळी जिल्ह्यांतील कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) विजेच्या जोडणीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
अगोदर या योजनेतून वीज जोडणी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा (१५ आॅगस्ट) मुहूर्त शोधला होता. त्यानंतर १६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातूनच या योजनेचे उद्घाटन केले. प्रत्यक्षात मात्र, अजूनही ११ केव्ही ही उच्चदाब वाहिनीच वावरापर्यंत पोहोचलेली नाही. यासंबंधीची कामे करण्यासाठी कंत्राटदार निश्चित झालेले नाहीत. ही योजना राबविण्यासाठी महावितरणला सलग तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवावी लागली. निविदांमधील दरसूची ही परवडणारी नसल्यामुळे कंत्राटदारांकडून प्रतिसादच मिळत नाही. त्यामुळे आता महावितरणने या योजनेसाठी प्रजासत्ताक दिनाचा (२६ जानेवारी) मुहूर्त तरी साधावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे, हे विशेष!
३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरलेल्या जिल्ह्यातील ९ हजार २१४ तर जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीज जोडणी देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. मागील ७ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे डोळे या योजनेकडे लागले आहेत. या योजनेंतर्गत एका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन किंवा तीन कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे सतत वीजपुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. वीज चोरीपासून सुटका होणार आहे. या योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात १६८ कोटी ८ लाख रुपये, तर जालना जिल्ह्यात १८३ कोटी ८८ लाख रुपयांची कामे केली जाणार आहेत.
मात्र, या योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवरच कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे जुलैपासून तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतरही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. निविदांमधील विद्युत साहित्यांचा दर हा बाजारभावापेक्षा कमी असल्यामुळे कंत्राटदारांनी या योजनेच्या कामांवर राज्यभर बहिष्कार टाकलेला आहे.
उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदे
सध्या ६५ ते १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी वीजपुरवठा केला जातो. सध्या सर्रासपणे आकडे टाकून कृषिपंपांना विजेचा वापर केला जातो. आता यापुढे उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून कृषिपंपांना वीज चोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीत एका रोहित्रावरून दोन किंवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होईल. उच्चदाब प्रणालीमुळे वीज हानीसुद्धा कमी होणार आहे.