माजलगावच्या शेतकऱ्यांचे पीपीई कीट घालून औरंगाबादेत आंदोलन; बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 06:00 PM2020-12-22T18:00:46+5:302020-12-22T18:12:52+5:30
Farmers of Majalgaon agitate with PPE kit in Aurangabad : कोरोनाचे कारण सांगून समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँकेच्या मनमानीला कंटाळल्याने शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन
माजलगाव/ औरंगाबाद : माजलगाव येथील एसबीआयच्या शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी औरंगाबाद येथील क्षेत्रीय शाखेसमोर मंगळवारी दुपारी पीपीई कीट घालून अनोखे आंदोलन केले. कोरोनाचे कारण सांगून समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळल्याने शेतकऱ्यांना पीपीई कीट घालून आंदोलन करावे लागले असे भारतीय जनता पार्टीचे माजलगाव तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांनी सांगितले.
माजलगांव येथील एसबीआय शाखेत कर्ज माफी मिळालेल्या सुमारे बाराशे लाभार्थी शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारण्यात आले आहे. पीक कर्ज कोणत्या कारणाने नाकारले याची माहिती देण्यात आली नाही. हे विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाचे कारण सांगून भेटण्यास टाळाटाळ करण्यात येते. बँकेच्या गेटसमोर शेतकऱ्यांना ताटकळत उभे रहावे लागते. शेतकऱ्यांबरोबरच पेन्शन धारक वयोवृद्धांची हेळसांड बँकेतील अधिकारी, कर्मचारी करतात. गुराळासाठी कर्ज मंजूर झालेले परंतु बँकेची पॉलिसी न घेतल्यामुळे वर्षभरापासून कर्ज देण्यात आलेले नाही. कर्जाची कामे दलालांमार्फत केल्यास त्यांची फाईल त्वरित मान्य करण्यात येते. बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना यासंदर्भात भेट घेण्याचा प्रयत्न केल्यास कोरोनाचे कारण पुढे करून ते भेट घेण्यास चार- पाच महिन्यांपासून टाळाटाळ करत आहेत. या व्यथा मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी औरंगाबादच्या सिडको येथील एसबीआयच्या क्षेत्रीय शाखेसमोर आंदोलन केले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन मागण्यांच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
पीपीई कीट घालून शेतकरी आंदोलनात
पीपीई कीट परिधान करून शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. तुम्ही आता कोरोनाची भीती बाळगू नका, आम्ही पीपीई किट घालून आलोय, आमच्या व्यथा ऐकून न्याय द्या, असे साकडे आंदोलनकर्त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे घातले. माजलगाव एसबीआय शाखेच्या कारभार, शाखाधिकारी आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, एसबीआयने माजलगांव तालुक्यात नवीन स्वतंत्र कृषी शाखा सुरू करावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. भाजपचे माजलगांव तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात बबन सोळुंके, ज्ञानेश्वर मेंढके, डॉ. भागवत सरवदे, बबनराव सिरसाट, कल्याणराव शेप, राधाकिशन सरवदे, नामदेव मुळे, अनंतराव जगताप, ईश्वरअप्पा खुर्पे, डॉ. अशोक तिडके, ज्ञानेश्वर सरवदे, अनंत शेंडगे, दत्तात्रय साडेगावकर, रमेशराव कुटे, सतीश राठोड यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, माजी महापौर बापू घडामोडे यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली.