जिल्ह्यातील ३२१ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के विम्याची रक्कम
By विकास राऊत | Published: September 6, 2023 01:43 PM2023-09-06T13:43:52+5:302023-09-06T13:45:03+5:30
पंतप्रधान पीकविमा योजना; अधिसूचना जारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत पावसाचा १६ ते ४० दिवसांचा खंड पडला आहे. २० महसूल मंडळांत सलग २१ हून अधिक दिवसांचा खंड पडला आहे. तेथील पिकांच्या उत्पादनात ५० टक्के घट येणार असल्याचा अंदाज तालुकास्तरीय समितीने व्यक्त केला आहे. त्यानुसार पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता या बाबीखाली शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई देण्याची अधिसूचना जारी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिले. यामुळे ३२१ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रभोदय मुळे, विमा कंपनी, स्कायमेट, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पेरणी व पावसाचा खंड
पीकविमा योजना खरीप हंगाम-२०२३ च्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक मंगळवारी झाली. जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर इतके असून त्यापैकी ६ लाख ५८ हजार १२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऑगस्टअखेर ४३१ मिलिमीटर पर्जन्यमान अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २७६ मिलिमीटर म्हणजेच ६४.१४ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत १६ ते ४० दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट आहे.
कोणत्या तालुक्यात सर्वेक्षण?
औरंगाबाद तालुक्यातील ४, फुलंब्री तालुका १, वैजापूर तालुका १० व गंगापूर तालुक्यातील ५ मंडळे आहेत. या मंडळाअंतर्गत ३२१ गावे असून त्यांचे सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीमार्फत केले. अहवालानुसार मका, कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्के घट शक्य आहे.
कृषी अधिकारी काय म्हणाले?
औरंगाबाद तालुक्यातील ४ महसूल मंडळांतील ६८ गावे, फुलंब्री तालुक्यातील एका मंडळातील २४ गावे, वैजापूर तालुक्यातील १० मंडळांतील १३३ गावे, गंगापूर तालुक्यातील ५ मंडळांतील ९६ गावे अशा एकूण २० मंडळांतील ३२१ गावांमधील पीकविमा संरक्षित शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
-प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी