शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या, पिकावंरील कीड नियंत्रणासाठी शासनाकडून मिळवा मोफत औषधे
By बापू सोळुंके | Published: December 1, 2023 04:26 PM2023-12-01T16:26:33+5:302023-12-01T16:26:49+5:30
रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो.
छत्रपती संभाजीनगर : एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनांतर्गत पीक सरंक्षण औषधे, तणनाशके, जैविक खते आणि जैविक कीड नियंत्रणासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित औषधे दिली जातात. बियाणे आणि रासायनिक औषधांचा यात समावेश आहे.
कशासाठी मिळते शासनाकडून अनुदान
रब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारी पिकासाठी शासनाची ही योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक आणि जैविक किटकनाशके शासनाकडून उपलब्ध करण्यात आली आहेत.
हरभरा बियाण्यासाठी हेक्टरी ५ हजार १०० रुपये
कृषी विभागातर्फे हरभरा बियाण्यासाठी शासनाने हेक्टरी ५ हजार १०० रुपये अनुदान दिले आहे. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर त्यांना अनुदानित बियाणे दिले जाते.
मोफत तणनाशके
पिकाची पेरणी करताच शेतात तण उगवू नये, यासाठी तणनाशकाची फवारणी शेतात करावी लागते. तणनाशकासाठी शेतकऱ्याने महिनाभर आधीच अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरीमधून निवड झाल्यानंतर त्यांना या योजनेंतर्गत तणनाशक औषधांचा पुरवठा केला जातो.
मोफत जैविक कीड नियंत्रण औषधे
पिकांचे सरंक्षण करताना जास्तीत जास्त जैविक औषधांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत जैविक कीड नियंत्रण औषधांचा पुरवठा करण्यात येतो. कृषी विभागाच्या शिफारशीनुसार निंबोळी अर्क, सूक्ष्म, जैविक संघ, (कॉसॉरशिया), फेरोमेन ट्रॅप्स, लुर्सहेलीकोव्हपी, स्टेम बोअरर, अझाडीरेकटीन १५०० पीपीएम, रासायनिक कीटकनाशक आदी प्रकारच्या औषधांचा पुरवठा करण्यात येतो.
कोणाला, किती मिळते अनुदान? (बॉक्स)
हरभरा बियाणे - ५१०० रुपये
बीज प्रक्रिया - ११० रुपये
सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड १ - ९९० रुपये
सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड २ - ५१७ रुपये
एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी एकूण - १४३५ रुपये
रब्बी आणि खरीप हंगामासाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारक
रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे आणि कीटकनाशक, बीज प्रक्रिया औषधांचा पुरवठा केला जातो. यासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. वर्षभर हे अर्ज स्वीकारले जातात. शिवाय प्राप्त अर्जांमधून खरीप आणि रब्बी हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी लॉटरी पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते.
- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक