पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचे गंगापूर कृषी कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 06:57 PM2021-06-08T18:57:30+5:302021-06-08T18:58:28+5:30
पीकविमा मंजूर करा अशी मागणी करूनही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.
गंगापूर : गत खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पीकविमा वेळोवेळी मागणी करूनही अद्याप मंजूर झाला नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयासमोर आज दुपारी जोरदार आंदोलन केले. पुढील आठ दिवसांत त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपविभागीय कृषि कृषी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जिपचे माजी सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.
पीकविमा मंजूर करा अशी मागणी करूनही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कार्यालय परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त होता. कृषी कार्यालयावर धडकेलेल्या शेतकऱ्यांनी समोरच जोरदार निदर्शनं करत चार तास आंदोलन केले. लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख व महसुलचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी आंदोलकांची भेट घेऊन याप्रकरणी त्रयस्थ अधिकाऱ्यांच्यामार्फत पुढील आठ दिवसात चौकशी करण्यात येईल, दोषींवर कारवाई करून वस्तूस्थिती शासनास कळविण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात शेतकऱ्यांसह संतोष जाधव, जिप सदस्य मधुकर वालतुरे, नंदकुमार गांधीले, पस सदस्य सुमित मुंदडा, कृष्णा सुकाशे, दिपक बडे, आप्पासाहेब पाचपुते, अण्णासाहेब जाधव, रवी चव्हाण, अमोल जाधव, सुरेश जाधव, कृष्णकांत व्यवहारे, राजेंद्र राठोड, देवेंद्र गवारे, युवराज ताठे यांचा सहभाग होता.