कृषी आढावा बैठकीत शेतक-यांनी कपाशीच्या नुकसान भरपाईसाठी केला आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 03:56 PM2017-11-24T15:56:46+5:302017-11-24T18:10:40+5:30
बोंड अळीबाधीत कपाशीची हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरीत संतप्त शेतक-यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकावा करुन आत्मदहनाचा प्रयत्न केला.
औरंगाबाद : बोंड अळीबाधीत कपाशीची हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरीत संतप्त शेतक-यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत अचानक शिरकावा करुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंगापूर तालुक्यातील वजनापूर या गावातील सात ते आठ शेतक-यांनी बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर टाकल्याने एकच गोंधळ उडाला.
राज्याचे फलोत्पादन संचालक व येथील पालक संचालक प्रल्हाद पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहानुरमिया दर्गा परिसरातील कार्यालयात आढावा बैठक सुरु होती. विभागातील सर्व अधिकारी बैठकीला हजर होते. सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजे दरम्यान जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० शेतकरी घोषणा देत अचानक कार्यालयात आले. शेतक-यांच्या हातात बोंडआळी लागलेली कपाशीच परदड होते. काही शेतक-यांनी कपाशीच्या बोंडाचे तोरण कार्यालयाला बांधले. ‘ सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’ असा घोषणा देत सर्वजण थेट बैठकीमध्ये शिरले.
आत येताच संचालक प्रल्हाद पोकळे सोबत विभागीय कृषी सहसंचालक प्रताप कदम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांच्या समोर संतापलेल्या शेतक-यांनी बाटलीतून आणलेले रॉकले अंगावर टाकून घेतले. यामुळे एकच गोंधळ उडाला. अधिका-यांमध्ये धावपळ माजली. यावेळी काही मिनीटातच पोलीसफाटा घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत शेतक-यांना शांत करण्यात अधिका-यांना यश आले होते. कपाशीवरील बोंडअळी बांधीत शेतक-यांच्या शेताचे सरसकट पंचनामे करुन हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आंदोलनकर्तांच्यावतीने संतोष जाधव यांनी मागणी केली.
शेतक-यांचा संतापदूर करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी लगेच कृषी आयुक्तांच्या नावे एक पत्र टाईप केले व त्यातील येथील शेतक-यांच्या मागण्यां मांडण्यात आल्या. या पत्राची एक प्रत आंदोलनकर्त्या शेतक-यांना देण्यात आली. लेखीपत्र घेऊनच शेतकरी कार्यालयाबाहेर पडले.
येत्या आठवडाभरात पंचनामे होणार
कपाशीवरील बोंडअळीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागातर्फे शेतकºयांचे तक्रार अर्ज भरुन घेतले जात आहे. पुढील आठवडाभरात पंचनामेही पूर्ण करण्यात येतील व शासनाला त्याचा अहवाल पाठविण्यात येईल.
- प्रल्हाद पोकळे, फलोत्पादन संचालक तथा पालक संचालक चौकट
हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी
जिल्ह्यात सुमारे ७५ टक्के कपाशीची लागवड झाली. संपूर्ण कपाशीवर बोंडअळी लागल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. शेताचे सरसकट पंचनामे करुन हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.
- संतोष जाधव, माजी सभापती अर्थ व बांधकाम (जि.प.)
शेतकरी आत्महत्या करणार नाहीतर काय करणार
१० एकरात कपाशी लावली होती. अवघे १० क्विंटल कपाशी हातात आली. जिथे ७० ते ८० क्विंटल अपेक्षीत होती. बाजारात विक्रीला आणेपर्यंत ६० ते ८० हजारापर्यंत खर्च आला. ६ हजार भाव पाहिजे होता पण ४ हजार ते ४२०० रुपये क्विंटल कपाशी विक्री होत आहे. बोंडअळीने मोठे नुकसान झाले, कपाशीला भाव नाही सततच्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करणार नाहीतर काय करणार.
- राजेंद्र चव्हाण, वजनापूर, तालुका गंगापूर