शेतकऱ्यांकडील कापूस संपला आणि दर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:05 AM2021-02-05T04:05:21+5:302021-02-05T04:05:21+5:30
बाजारसावंगी : शेतकरी कापूस विकून मोकळे झाले असून केवळ व्यापाऱ्यांकडे कापसाचे स्टॉक शिल्लक आहेत आणि आता कापसाच्या दरात ...
बाजारसावंगी : शेतकरी कापूस विकून मोकळे झाले असून केवळ व्यापाऱ्यांकडे कापसाचे स्टॉक शिल्लक आहेत आणि आता कापसाच्या दरात आठशे ते नऊशे रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी केलेल्या कापसामुळे व्यापारी मालामाल होणार असून शेतकरी मात्र आहे त्या अवस्थेतच राहणार असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
बाजारसावंगी, दरेगाव, पाडळी, ताजनापूर, शिरोडी, येसगाव, जानेफळ, ममुराबादवाडी या परिसरातील कापूस हा लांब धाग्याचा असून इतर भागातील कापसापेक्षा या कापसास जास्तीचा भाव मिळतो. परिसरातील शेतकऱ्यांकडे असलेला कापूस त्यांनी नोव्हेंबर महिन्यातच चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शिल्लक होता, त्यांनी डिसेंबर महिन्यात पाच हजार रुपये भाव झाल्यानंतर विकून टाकला. त्यामुळे जवळपास शेतकऱ्यांचा कापूस संपलेला असून आता केवळ व्यापाऱ्यांकडे कापसाचे स्टॉक शिल्लक आहेत. आता मात्र, कापसाचे दर आठशे ते नऊशे रुपयांनी वाढले असून पाच हजार आठशे ते पाच हजार नऊशे झाल्याचे दिसत असून शेतकरी मात्र हात चाेळत बसले आहेत. हे नेहमीचेच असून यात व्यापाऱ्यांचे मात्र चांगलेच फावत आहे.
चौकट
मक्याचे भाव कमीच
शासनाने मक्याचे भाव अठराशे पन्नास रुपये केलेले आहेत. मात्र बाजारात यापेक्षा कमी भावाने मका खरेदी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मक्याला चौदाशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता, तो आणखी कमी झाला असून तो एक हजार ते अकराशेपर्यंत गडगडला आो. शासकीय खरेदी केंद्रावर गर्दीमुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी अडचणी येत आहेत. यामुळे व्यापारी कमी भावात खरेदी करीत आहेत.