राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 07:01 PM2019-06-25T19:01:12+5:302019-06-25T19:05:53+5:30
शेतकऱ्यांना कृषीमालाची ने आण करण्यासाठी ह्या पुलाची कमी उंची अडचणीची ठरणार आहे.
हतनूर (औरंगाबाद ) : गतवर्षीच्या पिकविम्याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची उंची वाढविण्यात यावी या मागण्यांसाठी हतनूर, चिकलठाण व चापानेर परिसरातील शेतकऱ्यांनी माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले.
सध्या धुळे-औरंगाबाद राष्ट्रीय महा मार्ग क्र 52 च्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून हतनूर बसथांब्यावर उड्डाणपुलाचेही काम सुरू आहे. त्या उड्डाणपुलाची उंची साडे चार मीटर असल्याने ऊस कापसाच्या वाहनांसह परिसरातील शेतकऱ्यांना कृषीमालाची ने आण करण्यासाठी ह्या पुलाची उंचीची अडचण ठरणार आहे. त्यासाठी प्रस्तावित पुलाची उंची वाढविण्यात यावी. तसेच कन्नड तालुक्यातील चिकलठाण चापानेर या महसूल मंडळात पिकविमा तात्काळ देण्यात यावा यासाठी मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
प्रशासनातर्फे नायब तहसीलदार हारूण शेख यांनी माजी आ. जाधव व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून आंदोलनकर्त्यांच्या भावना वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन दिले. मात्र, जाधव व आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. अखेरीस जाधव यांच्यासह पंधरा आंदोलकांना पोलिसांनी अटक करून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात नेले. आंदोलनात पं.स सभापती मीना मोकासे, पं स सदस्य किशोर पवार ,साहेबराव अकोलकर ,अशोक वाळुंजे , सिद्धेश्वर झालटे ,जयेश बोरसे ,कैलास अकोलकर, शिवकांत मोहिते आदींचा सहभाग होता. कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, वाहतूक पोनि नामदेव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत ठोंबरे, बीट जमादार एस, बी ,चव्हाण यांनी पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.