२०० एकरांतील पिकांवर शेतकऱ्यांनी फिरविला नांगर
By Admin | Published: July 5, 2017 11:29 PM2017-07-05T23:29:37+5:302017-07-05T23:34:03+5:30
पालम : पावसाअभावी पेरणी केलेले सोयाबीन वाळून गेल्याने पुयनी शिवारातील २०० एकरांवरील पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम : पावसाअभावी पेरणी केलेले सोयाबीन वाळून गेल्याने पुयनी शिवारातील २०० एकरांवरील पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरविला आहे. त्यामुळे पेरणीचा खर्च आणि मेहनत वाया गेली असून या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसावर पालम तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. महागामोलाचे बियाणे खरेदी करून या पेरण्या करण्यात आल्या. सोयाबीन आणि कापसाची लागवड केली. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. पंधरा दिवसांपासून पावसाचा एक थेंबही पडला नाही. पेरणी केलेले बियाणे अंकुरले परंतु, पाऊस नसल्याने ही पिके वाळू लागली आहेत. पुयनी परिसरात गंभीर स्थिती निर्माण झाली असून २०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पूर्णत: वाळून जाण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे हे सोयाबीन आता तग धरणार नसल्याने शेतकऱ्यांनी रानात पाळी घालण्यास सुरुवात केली आहे. पाळी घालून पेरलेले सोयाबीन काढून टाकले जात आहे. शेतकऱ्यांनी आता दुबार पेरणीची तयारी सुरू केली आहे. बागायती नसलेल्या शेतात कापूस मोडण्यास सुरुवात झाली आहे.