२५ मेपासून सुरू होणार शेतकऱ्यांची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:54 PM2019-05-21T23:54:20+5:302019-05-21T23:55:07+5:30
पेरणीपूर्व ते पीक काढणीपर्यंतची तंत्रशुद्ध पद्धती, नवतंत्रज्ञान याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी २५ मेपासून शेतकऱ्यांची शाळा सुरू होणार आहे. विभागातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत मिळून २६५२ कृषिशाळा घेण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : पेरणीपूर्व ते पीक काढणीपर्यंतची तंत्रशुद्ध पद्धती, नवतंत्रज्ञान याची इत्यंभूत माहिती देण्यासाठी २५ मेपासून शेतकऱ्यांची शाळा सुरू होणार आहे. विभागातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत मिळून २६५२ कृषिशाळा घेण्यात येणार आहेत.
कृषिशाळा घेण्याची जबाबदारी कृषी विभाग, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आत्मा या तीन यंत्रणांवर टाकण्यात आली आहे. ९० टक्के शेतकरी असे आहेत की, ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यांनी अत्याधुनिक शिक्षण घेतलेले नाही. शेतीक्षेत्रातील नवनवीन शोधाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषिशाळा घेण्याचा निर्णय कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी खरीपपूर्व हंगाम बैठकीत जाहीर केला होता. कृषिशाळेमध्ये पेरणीपूर्व, पीक पेरणी, पीक वाढीची अवस्था, काढणी व काढणी पश्चात असे टप्पे ठरविण्यात आले आहेत. शेतकºयांना सक्षम करण्यासाठी कृषिशाळेच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान थेट बांधावर पोहोचविले जाणार आहे. या प्रक्रियेत विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कंपन्यांच्या तज्ज्ञ अभ्यासकांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षकांमार्फत प्रत्येकी एका गावात कृषिशाळा घ्यावी, असे आदेश आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ४०३ कर्मचारी ६२६ गावांत ८६९ कृषिशाळा घेणार आहेत. जालना जिल्ह्यात ३५४ कर्मचारी ५७९ गावांत ८२३ कृषिशाळा, तर बीड जिल्ह्यात ४२४ कर्मचारी ६८४ गावांत ९६० कृषिशाळा घेणार आहेत. विभागात एकूण ११८१ कर्मचारी १८८९ गावांत २६५२ कृषिशाळा घेणार आहेत. २५ मेपासून कृषिशाळेला सुरुवात होईल.
प्रत्यक्ष शेतावरच प्रात्यक्षिकासह शेतकºयांना माहिती देण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे कापूस पिकावरील ६३५, सोयाबीन १६२, मका ११३, तूर १०४, तर उसावरील २८ शेतीशाळा घेणार आहेत. याशिवाय नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाद्वारे १५२६, तर आत्माद्वारे ८४ कृषिशाळा घेण्यात येतील.
अळीच्या प्रादुर्भावाची स्थिती लगेच कळेल
यंदा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. कृषी अधिकारी, कर्मचारी व शेतकरी कृषिशाळेच्या निमित्ताने दिवसभर शेतावर असणार आहेत. पेरणीनंतर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला, तर लगेच त्याची माहिती कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठ यांना कळविण्यात येणार आहे. त्यासाठी खास अॅपही तयार करण्यात आले आहे. यावर काय उपाययोजना करायची, ते शास्त्रज्ञ लगेच सांगणार आहेत. यामुळे पिकांवरील अळीला वेळीच रोखण्यास मदत होऊ शकते.
चौकट
१७ वर्षांनंतर भरणार कृषिशाळा
खरीप हंगामापूर्वी कृषिशाळा भरविण्याची कृषी विभागाची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी २००३ मध्ये कृषी विभागाचे तत्कालीन आयुक्त सुधीरकुमार गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कृषिशाळा भरविण्यात आला होत्या. हा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनंतर कृषिशाळा भरविण्यात येत आहेत.