शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे-चव्हाण

By Admin | Published: August 26, 2015 12:39 AM2015-08-26T00:39:57+5:302015-08-26T00:47:18+5:30

जालना : मराठवाड्यात दुष्काळी स्थिती गंभीर असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. तात्काळ उपाय योजना करून शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे

Farmers should be forgiven by debt: Chavan | शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे-चव्हाण

शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे-चव्हाण

googlenewsNext


जालना : मराठवाड्यात दुष्काळी स्थिती गंभीर असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. तात्काळ उपाय योजना करून शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी जालन्यात केली.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित दुष्काळी परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अरूण मुगदिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आ. धोंडीराम राठोड, सुरेश जेथलिया, संतोषराव दसपुते, शंकरराव राख, शकुंतला शर्मा, कल्याण काळे, सेवा दलाचे विलास औताडे, आर.आर.खडके, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस विमलताई आगलावे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आयशा खान, डेव्हीड घुमारे प्रभाकर पवार , बाबूराव कुलकर्णी, रवींद्र तौर ज्ञानेश्वर पायगव्हाणे उपस्थित होते.
खा. चव्हाण म्हणाले, मराठवाड्यात भयावह स्थिती असून, सरकार मात्र झोपेचे सांग घेत आहे. झोपलेल्याला जागे करणे सोपे असते परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जाग कशी आणावी, असा सवाल करुन ते म्हणाले, की आता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. निवडणूक काळात केवळ घोषणांचा पाऊस पाडून हे सरकार सत्तेत आले आहे. सत्तेत आल्यानंतर सर्व घोषणा हवेतच विरल्या आहेत. सर्व आश्वासने कागदावरच असून, याची अमलबजावणी करण्याची भाजपा सरकारची कुठलीही मानसिकता दिसत नसल्याचे चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अन्यथा याचा स्फोट होण्यास वेळ लागणार नाही, असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला. या सरकारला बहुमताचा पारा चढला असून, सरकारच्या कार्यपद्धतीविरोधात रस्त्यावर उतरण्याचे संकेत चव्हाण यांनी परिषदेत दिले. काँग्रेस आघाडीच्या सरकारने शेतकरी अडचणीत असताना त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. मात्र, सध्याचे सरकार हे ढिम्म असून, सर्व पातळ्यांवर ते अपयशी ठरले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पीककर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याचे सांगून बँकांच्या असहकार्यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसनेच सभागृहात सरकारच्या कार्यपद्धतीवर आवाज उठवला नसून सत्तेतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही शेतकऱ्यांचा आवाज मांडला आहे. मात्र, तरीही सरकार जागचे हलायला तयारी नाही. राज्य करण्यासाठी ही मंडळी योग्य नसल्याचे सांगून सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे खा. चव्हाण म्हणाले.
भीमराव डोंगरे म्हणाले की, बँकांच्या असहकार्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, रोहिलागड येथील युनियन बँकेच्या अधिकाऱ्याने एका शेतकऱ्याने केवळ ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतलेले असताना त्याच्या सातबाऱ्यावर चक्क एक लाख ३५ हजारांचे कर्जाचा बोझा चढविला. डोंगरे यांनी पुरावा म्हणून सातबाराच उपस्थितांना दाखविला. फळबागांचा पीकविमा शेतकऱ्यांना अद्याप न भेटल्याने त्यांनी सरकार व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. तर केवळ राजकीय अकसापोटी जालन्यातील जलवाहिनी अंथरण्याचे १३० कोटी रुपये खर्चाचे मंजूर झालेले काम रद्द करण्यात आले. तसेच विद्यमान आमदार ३०० बंधारे उभारल्याचा दावा करीत असले तरी वखारी येथे एकच बंधारा उभारला असून, तोही आपल्या कार्यकाळातच झाल्याचा दावा माजी आ. गोरंट्याल यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक गणेश राऊत व धर्मा खिल्लारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी रवींद्र तौर, डेव्हीड घुमारे, कल्याण काळे यांंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी २ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Farmers should be forgiven by debt: Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.