शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे पीक घ्यावे
By | Published: December 7, 2020 04:02 AM2020-12-07T04:02:31+5:302020-12-07T04:02:31+5:30
कायगाव : शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे पीक घेण्याची सवय करून घ्यावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपूर उसाचा ...
कायगाव : शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे पीक घेण्याची सवय करून घ्यावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपूर उसाचा उतारा मिळण्याची शास्वती असते, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एस. जाधव यांनी केले. गळनिंब येथे शेतशिवाराची पाहणी केल्यानंतर कृषी विभागाच्या प्रमुख शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांनी एकडोळा पद्धतीने ऊस लागवड करून, पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे काळाची गरज आहे. यासह लागवड करताना पाचफुटी सरीत उसाची लागवड करत उसाच्या रोपांची संख्या मर्यादित करून पीक जोपासावे, असे आवाहन त्यांनी केले. पाणी आणि खताएवढेच उसाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे उसाची योग्य वाढ होते. एकरी ४५ हजारांपर्यंतच उसाचे रोप मर्यादित असावे, त्यापासून शेतकऱ्यांना सुमारे ७० टन प्रतिएकर एवढा उतारा मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रमुख शास्त्रज्ञ तथा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. एस. बी. पवार, प्रा. डॉ. भगवान कापसे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, मंडळ कृषी अधिकारी विष्णू मोरे, कृषी पर्यवेक्षक वैभव घोडके, कल्याण गायकवाड, कृषी सहायक मनीषा तागड आदींची उपस्थिती होती. अगरवाडगाव, गळनिंब, भिवधानोरासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
-- कॅप्शन : गळनिंब शेतशिवाराची पाहणी करताना विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एस. जाधव, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. पवार, कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे आदी.