शेतकऱ्यांनी वनौषधीच्या शेतीकडे वळावे; त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:34 PM2018-10-20T18:34:28+5:302018-10-20T18:35:14+5:30
शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीच्या शेतीकडे वळावे, याद्वारे त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल, असे आवाहन केंद्रिय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यांनी आज केले.
औरंगाबाद : आयुर्वेद व आयुष पॅथीवर संंशोधन करण्यासाठी जगातील १२ देशाशी करार झाला आहे. यामुळे येत्या काळात वनौषधीला मोठी मागणी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीच्या शेतीकडे वळावे, याद्वारे त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल, असे आवाहन केंद्रिय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यांनी आज केले.
एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आज शहरात आले होते. नाईक यांनी पुढे सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ) मध्ये गेल्या वर्षी भारताचा एक प्रतिनिधीचा समावेश झाला आहे. याद्वारे आयुर्वेद, आयुष व अन्य देशातील वैद्यकीय पॅथीचा संबंध यावर संशोधन करण्यात येणार आहे. यामुळे योगापाठोपाठ आयुर्वेद, आयुषला जागतिक मान्यता मिळत आहे. देशातीलच नव्हे तर विदेशी कंपन्यानकडूनही आयुर्वेदिक औषधाची मागणी वाढू लागली आहे.
मेडिसीन प्लँट बोर्ड सुरु
वनौषधीचे उत्पादन वाढावे यासाठी मंत्रालयाने मेडिसीन प्लँट बोर्ड सुरु केले असून त्याद्वारे वनौषधीची शेती करणाऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, तसेच अर्थसाह्य केले जात आहे. यात खाजगी व स्वयंसेवी संस्था उतरल्या आहेत. विविध कंपन्यांशी करार करुन वनौषधीची शेती केली जात आहे. याचधर्तीवर पुण्याच्या आसपासच्या परिसरात अडीच हजार एकरवर वनौषधीची लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक घेत असताना मधल्या ३ ते ६ महिन्याच्या काळात वनौषधीची शेती करावी, जेणे करुन उत्पन्नात वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले.
आयुर्वेदीक उपचार घेणाऱ्यांना सरकारी योजनाचा लाभ
श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, जसे अॅलोपॅथीचे उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सरकारच्या विविध योजना, सवलती देण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर आयुर्वेदीक उपचार घेणाऱ्यांसाठीही सरकारी योजनाचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु आहे. येत्या काळात याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोेषणाही त्यांनी केली.