म्हशीचा गोठा ते पीएसआय; शेतकरी पुत्राचा थक्क करणारा ‘विशाल’ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:37 PM2020-03-21T18:37:46+5:302020-03-21T18:51:26+5:30

शेतकरी पुत्राची म्हशीच्या गोठ्यातून थेट पीएसआयपदावर 'विशाल' झेप

Farmer's son victorious journery; jumps from the buffalo herds to the PSI post | म्हशीचा गोठा ते पीएसआय; शेतकरी पुत्राचा थक्क करणारा ‘विशाल’ प्रवास

म्हशीचा गोठा ते पीएसआय; शेतकरी पुत्राचा थक्क करणारा ‘विशाल’ प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देविशालने यश केले आई, वडिलांना समर्पित थेट पद मिळविणारा पंचक्रोशीतील पहिलाच तरुण 

- सुनील गिऱ्हे

औरंगाबाद : कोणीही गॉडफादर नसताना केवळ जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर औरंगाबाद तालुक्यातील बाळापूरच्या एका शेतकरी पुत्राने म्हशीचा गोठा ते पीएसआयपदापर्यंत 'विशाल' झेप घेतली आहे, त्याचा हा प्रवास सर्वांनाच थक्क करून सोडणारा आहे. पंचक्रोशीतील तो पहिलाच फौजदार ठरला असून कठीण काळातही कुटुंबीय भक्कमपणे मागे उभे रहिल्यानेच या पदापर्यंत पोहोचू शकलो, त्यामुळे हे यश आई, वडिलांसह भावाला समर्पित करीत असल्याच्या भावना विशाल अशोक पवार यांने व्यक्त केल्या.

औरंगाबाद शहरापासून अवघ्या १० कि़ मी. अंतरावर असलेल्या बाळापूर गावात विशाल अशोक पवार (२७) हा तरुण आई, वडील आणि मोठ्या भावासह राहतो. वडील अशोक नाना पवार यांच्या नावे जेमतेम तीन ते चार एकर कोरडवाहू शेती असून, त्याला जोडधंदा म्हणून ते दुग्ध व्यवसाय करतात. पाऊस चांगला झाल्यास शेती, नसता म्हशीचे दूध शहरात विक्री करून ते आपला उदरनिर्वाह चालवितात. त्यांची दोन मुले मोठा शरद आणि धाकटा विशाल हे दोघेही वडिलांना शेतीसह दूध व्यवसायात मदत करतात.

पहाटे चार वाजता उठून म्हशीचे दूध ते विक्रीला नेणे हा रोजचा दिनक्रम ठरलेला होता. वडील किंवा भाऊ दूध घेऊन गेल्यानंतर विशाल कोरडवाहू शेतीत जास्त काम नसल्याने सायंकाळपर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे. त्यानंतर गोठ्यात जाऊन म्हशीचे दूध काढून ते वडील आणि भावाला विक्रीसाठी देणे ही त्याची दिनचर्या होती. मात्र, स्पर्धा परीक्षेत यशासाठी  अधिक अभ्यासाची गरज असल्याचे लक्षात घेऊन तो त्याने पुणे गाठले. या काळात विशालने मोठा अधिकारी व्हावा हे स्वप्न पाहत वडील आणि भावाने त्याला आर्थिक पाठबळ दिले. 

तीन वेळा यशाने दिली हुलकावणी

२०१४ मध्ये त्याने पुणे गाठले आणि अभ्यास सुरू केला. रोज तो ८ ते १० तास अभ्यास करीत असे. याच बळावर तो चार वेळा मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरला. मात्र, यापैकी तीन वेळा त्याला पुढचा टप्पा गाठता आला नाही. तीन ते चार गुणांच्या फरकाने तो अपयशी ठरला. मात्र, तरीही त्याने जिद्द सोडली नाही. अखेर २०१८ मध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. शारीरिक चाचणी व मुलाखतीचाही अडथळा दूर झाल्यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत त्याने ४६ वा क्रमांक मिळविला. पंचक्रोशीतून पहिला फौजदार बनण्याचा मान त्याने मिळविला असून त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोशल मीडियापासून दूर रहा 
या जिगरबाज तरुणाने पहिली ते सातवीपर्यंत बाळापूर जि.प. प्रा.शाळेत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. यानंतर ७ वी ते १२ वीपर्यंत धारेश्वर माध्यमिक विद्यालयात, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात पदवी आणि एम. एम. अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारी दरम्यान मोबाईलचा केवळ कुटुंबियांशी संपर्क साधण्यासाठी उपयोग केल्याचे तो सांगतो. सोशल मीडियापासून चार हात दूर राहिल्याने फायदा झाल्याचेही त्याने नमूद केले. 

अडाणी असल्याने खूप सोसले 
आम्ही अडाणी असल्याने शेतीनंतर दुग्ध व्यवसाय करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे आम्ही जे सोसले ते मुलांनी सोसू नये म्हणून आम्ही त्याला शिकविण्याचा निर्णय केला. त्याने आमचा विश्वास सार्थ ठरविल्याचा आनंद असल्याचे विशालचे वडील अशोक पवार यांनी सांगितले.

पोरानं हार मानली नाही, याचा लय आनंद...
पुण्याला पाठविल्यानंतर तो नक्कीच कुटुंबियांचे नाव कमवेल असा विश्वास होता. मात्र, सुरुवातीला चार पाच प्रयत्नात त्याला अपयश आल्याने चिंता लागली होती. कधी कधी तर त्याला मस्करी म्हणून म्हातारा होईपर्यंत शिकणार का रे बाबा असे म्हणायचो. मात्र, त्याचे एकच उत्तर असायचे मी पास होऊनच दाखविणार. आता तो फौजदार झाल्याने चिंता मिटली असून, पोरानं हार मानली नाही, याचा लय आनंद असल्याचे आई लक्ष्मीबाई या म्हणाल्या.

आई, वडील, भावाचा विश्वास हेच माझे यश
आई, वडिलांसह भावाने खर्चाचा क्षणभरही विचार न करता पुण्याला अभ्यासासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. याच दिवशी कुटुंबियांचा माझ्यावरील विश्वास सार्थ ठरविण्याची शपथ घेतली होती. आज जे काही यश मिळाले ते कुटुंबियांमुळेच, अशी प्रतिक्रिया विशाल पवार याने दिली आहे.

Web Title: Farmer's son victorious journery; jumps from the buffalo herds to the PSI post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.