शेततळ्यांच्या अनुदान कपातीची ‘मेख’ !
By Admin | Published: March 2, 2016 10:57 PM2016-03-02T22:57:07+5:302016-03-02T23:09:18+5:30
राजेश खराडे , बीड मागेल त्याला शेततळे या अभिनव योजनेचा सध्या गवगवा आहे. मात्र, अनुदान कपातीची मेख शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. पूर्वी शेततळ्यांसाठी ८२ हजार रूपये अनुदान होते.
राजेश खराडे , बीड
मागेल त्याला शेततळे या अभिनव योजनेचा सध्या गवगवा आहे. मात्र, अनुदान कपातीची मेख शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. पूर्वी शेततळ्यांसाठी ८२ हजार रूपये अनुदान होते. ते आता ५० हजार रूपयांपर्यंत खाली आणले आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाने पिचलेला शेतकरी अनुदान कपातीमुळे अडचणीत आला आहे.
शेतकऱ्यांची संख्या ७ लाखांवर आहे. त्या तुलनेत २४०० शेततळी उभारण्याचे उद्दिष्ट कृषी विभागासमोर आहे. आकडेवारीच्या दृष्टीने ही संख्या कमी असली तरी ज्या कासवगतीने योजनेला सुरवात झाली आहे त्यानुसार कृषी विभागाचे कसब पणाला लागणार आहे. शेतळ्याकरिता ५० हजाराचे तुटपुंजे अनुदान तेही वेगवेगळ्या टप्प्यात लाभार्थ्यांना मिळणार आहे. शिवाय प्लॅस्टिक कव्हरसाठीचा खर्च हा वेगळाच. सद्यस्थितीला शेतकऱ्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. यात लाखो रूपये खर्चून शेततळे उभारण्याची शेतकऱ्यांची मानसिकताच नाही. यातच कृषी अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळे सध्या तरी बीड तालुका वगळता इतरत्र शेततळ्यांसाठी असलेली आॅनलाईन प्रक्रिया आॅफलाईन असल्याची स्थिती आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. या कालावधीत बोटावर मोजण्याइतकेच प्रस्ताव कृषी कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. त्यातूनच हार्डकॉपींची छानणी होणार आहे.
यापूर्वीही जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना राबविण्यात आली होती. मात्र, याला अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी केवळ अनुदान लाटण्यासाठी योजनेत सहभाग नोंदविला होता. आजघडीला याच शेततळ्यांचे डबके झाले आहे.