जमीन नावावर न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; तलाठी,मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 03:59 PM2019-11-19T15:59:17+5:302019-11-19T16:02:35+5:30
दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने शेत जमिनीचा निकाल दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ताब्यात मिळालेली जमीन नावावर होत नव्हती
करमाड : तालुक्यातील मलकापूर (पिंप्रीराजा जवळ) शिवारात एका शेतकऱ्याने सोमवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष रामचंद्र जाधव (३२, रा. हर्सूल, औरंगाबाद ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही जमीन नावावर होत नसल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
संतोष रामचंद्र जाधव यांनी सोमवारी रात्री (मलकापूर शीवारातील गट नं ४३, सजा पिंप्रीराजा ता.औरंगाबाद. अंतर्गत ) लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोषने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिट्ठीनुसार तलाठी एम.एस.कदम व मंडळ अधिकारी के.डी.वाघ. यांनी दिलेल्या मानसिक त्रासापोटी आत्महत्या करत असल्याचे नमूद केलेले आहे .वरील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर आत्महतेस कारणीभूत ठरल्या प्रकरणी करमाड पोलीस ठण्यात मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने शेत जमिनीचा निकाल दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ताब्यात मिळालेली जमीन नावावर होत नाही म्हणून आत्महत्या केल्याची तक्रार आहे. सदर जमिन महसूल दरबारी नावावर झाली नसल्याचे (7/12 त नाव न आल्याने) मानसिक त्रासातून संतोष ने आत्महत्या केली आहे. संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी वारंवार पैश्याची मागणी केली असे मयतचे बंधू दीपक रामचंद्र जाधव यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे. पुढील तपास करमाड पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक अजिनाथ रायकर करत आहेत.