परभणीतील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 06:27 PM2018-10-24T18:27:40+5:302018-10-24T18:35:14+5:30
मराठवाड्याच्या सिंचनाचे पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आज परभणीतील शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.
औरंगाबाद : उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांतून जायकवाडी धरणात तात्काळ पाणी साडावे आणि मराठवाड्याच्या सिंचनाचे पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आज परभणीतील शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.
अखिल भारतीय किसान सभा परभणी जिल्हा कमिटीतर्फे हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विलास बाबर, लिंबाजी कचरे, लक्ष्मीकांत साकुडकर, दिपक लिपणे, गोपाळ कुलकर्णी, रामकिशन खवळे, आनंतराव कच्छवे, अंकुश तवर, सुदामराव अंधळे, मुंजाजी काळे , रामप्रसाद कदम यांच्यासह तीस ते चाळीस शेतकरी आणि कामगारांंची उपस्थिती होती.
२०१४ पासून परभणी जिल्हासह मराठवाडा दुष्काळात होरपून निघत आहे. जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला सिंचनासाठी मिळणाऱ्या ४२० दलघमी पाण्याची कपात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले जात आहे. १२ सप्टेंबर रोजी पाणी वाटपाचे फेरनियोजन करून शेतकऱ्यांच्या सिंचनाचे पाणी कपात करून बिअर कंपन्यांच्या घशात पाणी घालण्याचा डाव आखखल्याचा संताप यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. हा निर्णय रद्द करून परभणी जिल्ह्याला रब्बीसाठी चार पाणी पाळ्या आणि उन्हाळ्यात जनावऱ्यांच्या चाऱ्यासाठी, पिण्यासाठी दोन आवर्तने सोडण्याची आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली.